चि. नीती, स्वाती,ज्योती आणि तेजू,
सुंदर नितळ आकाशात पश्चिमेला क्षितिजाकडे झेप घेणारी बगळ्यांची शुभ्र मालिका अनामिक व्यूह रचून स्वैर उडते आहे, सूर्यबिंब भूमीला टेकायच्या बेतात आहे, समोर एका बाजूला हिरवे हिरवे कोवळ्या पिकाचे गालिचे तर दुसरीकडे लोंब्या लागलेली गव्हाची रोपेच रोपे सर्व दूर पसरलेली.... कांहीतरी लिहावे असे वाटायला सुयोग्य असा माहौल...हे आहे नानामामाचे सुंदर शेत. पण आनंद यातच सामावलेला नाहीं. आज विशेष हा आहे की माझ्यासोबत तुमची आई आणि नानामामा आहेत आणि शेताचे वर्णन करताना, आमच्या प्रश्नाना उत्तरे देताना नानामामाच्या चेहे-यावरचा उत्कट असा भरपूर उत्साह आहे.
मामा उत्साहाने सांगत होता...
"आक्का, दोन प्रकारांनी गहू लावला आहे. एकात पेरणी आधी पाणी दिले आणि दुस-यात पेरणी नंतर. दुस-या प्रकारात पीक थोडे कमी येते पण नको असलेली रोपे, कचरा, तण वगैरे उद्भवत नाहीत आणि मजुरी कमी लागते. इथे मजूर मिळणे हे एक दिव्य असते.
"हे बघा, इथे गव्हाबरोबर एक एक ओळ धने आणि मेथीची आहे. अशा लावण्यामागे उद्देश हा की गव्हाला पूरक असा वातावरणातला Nitrogen ह्या दोन्ही रांगा देतात. पलीकडच्या शेतात गव्हाबरोबर वाटाणा लावला आहे"
अक्काचे मन इतिहासात खोल गेलेल्या काळात क्षणात गेले..
"नाना, इथे मधेच एक डेरेदार आंब्याचं झाड होते ना?"...आक्का.
"अग, ते नुकतेच पडले... पण त्याचेच एक रोप तिथे पलीकडे लावले आहे."...नाना
इतक्यात एक रंगीत पक्षी समोरून गेला...खंड्या असावा. नाना म्हणाला, "इथे जेंव्हा जेंव्हा आम्ही येतो तेंव्हा भारद्वाज दिसतोच."
व्वा.. त्याचं दिसणे भाग्याचं. इथल्या पुण्य भूमीवर तो तर हवाच. आजही तो असणारच पण मी नाही शोधत त्याला. उगीच दचकायचा.
नानाबरोबर शेतात हिंडायला जाणे ही एक माझ्यासाठी पर्वणी असते. शेतीत स्वत: लक्ष घात्ल्याला त्याला आता तीन दशकाहून जास्त काळ लोटला आहे. एखाद्या अपत्याप्रमाणे त्याने शेतीला जपलय, वाढवलय आणि आताचा शेतीचा व्याप पाहिला तर सा-याना खूपच अभिमान वाटावा. ह्या कित्येक वर्षात अनेकानेक प्रयोग त्याने केले. जैविक शेती हा त्यातला सर्वोत्तम ठरला. Inorganic खत टाकणे कांही वर्षापासून त्याने एकदम बंद केले. जैविक खताबरोबरच जैविक कीटक नाशकांचाही प्रयोग नानाने केला आहे. सुरुवातीला उत्पादन जरा कमी आले खर्चही वाढला कारण साखर कारखान्यातून तो तिथले उसाचे अवशेष खत म्हणून विकत घ्यायचा पण कसदार चवदार पीक आलेले पाहून इतराना अनुकरण करावे असे वाटायला लागले. नानाचे विचार कसे व्यापक होते ते त्याच्या एका निरीक्षणाने कळते. "Inorganic खतांचा आणि Inorganic कीटक नाशकांचा एक वाईट परिणाम असा की आजूबाजूचे पक्षी हळू हळू कमी होऊ लागले आणि हे लोकांच्या नजरेत हळू हळू आले..." खरेच माझ्या हे लक्षात जरा उशिरा आले...पक्ष्यांचा गोड चिवचिवाट आणि बरेच पक्षी असणे हे नानाच्या ह्या परिसरातले वैशिष्ठ्य मला उशिरा उमगले. चार पाच वर्षापूर्वी नानाने हजार बाराशे सागाची रोपे शेताच्या कडेला लावली होती. आज ती सारी झाडे पंधरा फूट उंच आहेत. इतके सुरेख दृश्य दिसते ते. शेताच्या साधारण मधोमध असा एक जोड वृक्ष आहे. ते एक अजोड असे उदाहरण झाले आहे. तीन वृक्ष एकात एक मिसळून तो एक संयुक्त वृक्ष झाला आहे. पिंपळ, फेफरे आणि लिंब. इतक्यात हळूवारपणे एक शुभ्र पीस माझ्या समोरच अलगद खाली आले. मला आठवले. मागे एकदा इथेच सांवरीच्या कापसाचा वृक्ष होता...त्यानेच बहुधा हे पीस धाडले असावं...मला विसरू नको, म्हणत.
विवेक गेल्या कांही वर्षात हळू हळू शेतीला वेळ देऊ शकला आणि आता तर मोठ्या आत्मविश्वासाने तो कांही निर्णय घेऊन त्याचा असा वेगळा ठसा उमटवताना दिसला. त्यातले एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्याने सुरु केलेला drip irrigation चा प्रयोग. रु. 45000/- प्रती एकर खर्च लागलेला हा प्रयोग त्याने कांही एकरामध्ये राबवला आहे. त्याचा फायदा काय? एक तर योग्य असा पाणीपुरवठा (ना कमी ना अवास्तव जास्त), पुन: सर्वत्र समप्रमाणात पाणी दिले जाणे. जमीन खाली वर, उतारावर, चढावर कशीही असली तरी योग्य ठिकाणी योग्य पाणी जाण्याची खात्री आणि ह्यामुळे झालेला उत्पन्नात चांगला फरक.
आणखी एक नाना-विवेक यांनी केलेला नवा प्रयोग हा अद्रक (अले) शेतीचा. दोनच वर्षे झालीत ह्याला. उत्पन्न आणि break even ह्यांचा समतोल पार करून फायद्याच्या बाजूला जाणे लवकरच घडून यावे.
घरी गोधन भरपूर आहे, त्यामुळे गोमुत्र, शेणखत घरचेच आहे. जैविक खत घरीच तयार होते. असे सर्व अनुकूल वातावरण स्वकष्टाने, स्वत:च्या बुद्धीबळावर नाना-विवेक ह्यांनी आज निर्माण केलेले आहे. दोघेही पेशाने डॉक्टर आहेत पण तो पेशा संभाळून ही एवढी शेती संभाळणे, पुन: कसल्याही आड मार्गाचा चुकूनही अवलंब न करता आणि सातत्याने समाज प्रबोधन करीत अडीअडचणीना लोकाना सढळ हाताने मदत करत हे पिता-पुत्र आज गावात मानाचे स्थान मिळवून आहेत. स्व. भाऊसाहेबांच्या अद्वितीय अस्तित्वाची ओळख पुढल्या ह्या दोन्ही पिढ्या कायम ठेवत आहेत हे तर ह्या स्थानाचे महद्भाग्य.