Tuesday, August 30, 2022

 

घर जपानमध्ये पण घरवाली भारतीय

 

पहा कसा सुसज्ज आधुनिक तंत्रांचा वापर केलाय..

 

हेवा वाटावा....!!!!

 

आणि ह्या घरात तुळशीची कुंडी पण आहे जी व्हिडिओच्या शेवटाला दिसते.

 

फक्त "हे माझ्याकडे का नसावं" हा विचार सोडून द्या कारण ह्या अधिभौतिकतेला भारत अजून पोचलेला नाही.

 

https://www.youtube.com/watch?v=aCpoq0oQQdg

 

मधुसूदन थत्ते

३०-०८-२०२२

Tuesday, August 9, 2022

 

महाकवी कालिदास कहाणी (आख्यायिकांवर आधारित )
====================================
अडाणी, निरक्षर पण सुस्वरूप असा एक गुराखी होता... त्याचे नाव होते कालिदास
त्या राज्याच्या गर्विष्ठ राजकन्येचा हट्ट होता की आपल्याला बुद्धिमत्तेत हरवणा-या तरुणाशीच लग्न व्हावे. तिची खोड मोडावी म्हणून प्रधानाने काही विद्वानांना कालिदासासह तिच्याकडे एक सूचना देऊन पाठविले..."राजकन्येने, कालिदासाआधी त्याच्या शिष्यांची परीक्षा पहावी"
एक एक करत राजकन्येने पाहिले, सारेच शिष्य विद्वान आहेत...तिला वाटले ह्यानंतर त्यांच्या गुरूची म्हणजे कालिदासाची परीक्षा पहाणे वेडेपणा होईल...
कालिदास वाचला आणि प्रधान जिंकला... राजकन्येची खोड मोडता आली...कालिदासाशी लग्न लावून..
राजकन्येला हे कळायला कितीसा वेळ लागणार? ती संतापली आणि पहिल्याच रात्री दिले त्याला हाकलून..
कालिदासाचा प्रचंड अपमान झाला...आत्महत्येच्या विचाराने तो कालीमातेच्या मंदिरात गेला. कालीमाता तिथे प्रगट जाली आणि तिने "सर्व विद्या प्रदाभाव" असे त्याला तात्काळ केले.
कालिदास राजकन्येला भेटायला गेला. त्याचे मुळातले सौंदर्य आता ह्या सरस्वती कृपेने शतगुणित झाले होते.
तरीही तुच्छतेने राजकन्येने त्याला विचारले
"अस्ति कश्चिद वाग्विशेष:?" (मठ्ठच आहेस की काही शिकला आहेस?)
राजकन्येच्या प्रश्नातील प्रत्येक शब्दापासून सुरू करून कालिदासाने महाकाव्ये धडाधड म्हणून दाखविली.
अस्ति ह्या पहिल्या शब्दापासून...
"अस्त्युत्तरस्यां दिशिदेवात्मात |
हिमालयोनाम नगाधिराज: "
अशी "कुमारसंभवा"ची सुरुवात.
कश्चिद शब्दापासून...
"कश्चिद कांता विरहगुरुणा स्वाधिकारात प्रमत्त: |" अशी मेघदूताची सुरुवात
आणि..
वाक शब्दापासून
"वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिप्रत्तये" अशी रघुवंशाची सुरुवात...
ह्या सर्व काव्यामधला प्रतीभाविलास पाहून राजकन्या खूष झाली. कालिदासाची स्मरणशक्ती आणि उच्चारशुद्धी पाहून प्रसन्न झाली आणि सलज्जतेने त्याच्याकडे पाहू लागली
पण एकदा अपमानित झालेल्या कालिदासाने मात्र ह्यावेळी तिला नाकारले.
त्याच्यामधल्या बदलाला राजकन्याच एकमेव कारणीभूत होती हे ध्यानी घेऊन त्याने तिचा योग्य शब्दात आदर केला आणि तो निघून गेला...
राजकन्या संतापली. तिने त्याला शाप दिला..
"तुला स्त्रीच्या हातूनच मृत्यू येईल"
पुढे कालिदास देशोदेशात फिरला. त्याने खंडकाव्य, महाकाव्य अशी रचली. खूप सुख अनुभवले पण त्यामुळे ती विलासी झाला...नाना तऱ्हेच्या व्यसनांमध्ये त्याने आयुष्य घालवायला सुरुवात केली आणि अखेर एका कलावंतीणीकडे असतांना त्याला समजले की त्या राजाने समस्येसाठी कवितेची एक ओळ दिली आहे आणि दुसरी ओळ जमवणा-याला मोठे बक्षिश जाहीर केले आहे.
राजाची ओळ होती
"कमले कमलोत्पत्ति: श्रूयते न तु दृश्यते ..||
(कमळातूनच कमळ उत्पन्न झाले आहे असे ऐकण्यात तर आले आहे पण अद्याप पाहण्यात काही आले नाही)
कालिदासाने ती ओळ ऐकली आणि त्या कलावंतीणीच्या सुंदर मुखाकडे पहात तात्काळ तिला प्रश्न केला...
"बाले, तवमुखांभोजे कथं इंदीवरद्वयम |"
(मुली तुझ्या मुख कमळावर ही दोन नेत्रकमळे कशी उगवली?)
वा ….कलावंतीणीला खूप आनंद झाला..तिने पुन: एकदा त्या दोन्ही ओळी म्हटल्या...
कमले कमलोत्पत्ति: श्रूयते न तु दृश्यते ..|
बाले, तवमुखांभोजे कथं इंदीवरद्वयम ? ||
पण मग तिच्या मनात स्वार्थ आला...बक्षीस आपल्यालाच मिळावे...राजाची समस्यापूर्ती तर छान झाली आहे...
तिने कालिदासाची गुपचूप हत्या केली. तिला काय माहित की कालिदासालाच शोधण्यासाठी राजाने, (जो कालिदासाचा मित्र होता), हा डाव टाकला होता.
कलावंतीण राजाकडे गेली आणि तिने समस्यापूर्ती केली खरी पण राजाला लग्गेच संशय आला...तिला दरडावून विचारल्यावर तिने सारे वृत्त सांगितले...राजाला फार दु:ख झाले. कलावंतीणीला शिक्षा झाली.
नंतर राजाने कालिदासाचे स्मारक उभारले. ही जागा सिंहद्वीपातील मातर प्रांतात किरिन्दी नदीच्या मुखाजवळ अजूनही दाखवली जायची...
संदर्भ:अभिज्ञान शाकुंतल निरूपण...प्रा. राम शेवाळकर ...पृष्ठ १६-१८
संक्षिप्त शब्दांकन : मधुसूदन थत्ते
२७-०७-२०१४



 हे तर त्रिभुवनाचं दर्शन !!! इथे प्रत्यक्ष परमेश्वर पाहावा.

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥
कसला क्षुल्लक क्रोध अन कसला क्षुद्र अभिमान !!!
हे मना, तू हे दिव्य दर्शन घेऊन काही तरी शिक...असेच मी मनाला म्हंटले.
नितीताईने हे अलौकिक दर्शन आपल्याला घडवले आणि तिचा कॅमेरा नित्य आपल्याला असेच एक एक सौंदर्य दाखवत असतो...!!!
मधुसूदन थत्ते
३०-०७-२०२२



 

देवाच्या तरी दारी

ईगो ठेवी बाहेरी ...

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

मित्रांनो आजचा अनुभव...

सौ आणि मी नारद-मंदिर (सदाशिव पेठ, पुणे) परिसरात होतो. छत्री नव्हती..नेमका पाऊस आला...स्वामी समर्थांचा मठ तिथेच होता...गेलो दर्शनाला..

मठाबाहेर रस्त्यालगतच्या पायरीला लागून रस्त्यावर एक काथ्याचे पायपुसणे होते. आम्ही आमची पायतणे अनवधानाने त्याच्यावरच काढली..आत गेलो..दर्शन घेऊन बाहेर आलो..

इतक्यात..

"अहो...ते काथ्याचे पाय पुसणे जोडे ठेवायला नाही...!!!" एक चाळीशीचा सज्जन जरा करड्या स्वरातच म्हणाला...

"ओहो, आमच्या लक्षात नाही आलं हो...चूक झाली..क्षमा असावी..." मी

त्या सज्जनाचा चेहेरा जरा निवळला आणि आम्ही निघालो

..

इतक्यात, पुन:

" काका, तुम्हालाही आता तेच सांगायचे का? अहो त्या पायपुसण्यावर चपला ठेवायच्या नाहीत.."

तोच सज्जन दुस-या एका वृद्धाला सांगत होता...त्याच अधिकार वाणीने..

"कोण तुम्ही? मला सांगणारे..? मी गेली १५ वर्षे मंदिरात येतो आहे..मला शिकवू नका..." तो वृद्ध

"पुन: सांगतो, चपला तिथे ठेवायच्या नाहीत. ठेवल्यात तर मी पायाने देईन भिरकावून..." सज्जन...

आम्ही पुढे काय झाले हे पहायला थांबलो नाही...स्वामी कृपेने पाऊस थांबला होता...

पण मनोमन म्हटले...

"स्वामी उरला सुरला ईगो निपटून काढायला मला मदत करा..." !!!!

 

मधुसूदन थत्ते

०९-०८-२०२२