Thursday, September 18, 2014

सुमनांनो तुम्ही झाडाची शोभा की माझ्या परडीची?
मी असेन ७-८ वर्षाचा...एक सुंदर, विलोभनीय नील-कमल मला दिसले...पद्मालयाच्या (जळगाव जिल्हा) मंदिरा समोरच्या जलाशयाच्या मध्यावर..."मी इथेच बरे"..जणू सांगत होते.
"हवय का तुला?" माझा मोठा आतेभाऊ म्हणाला आणि मारला त्याने सूर त्या खोल पाण्यात...
कमळ हाती आले..पण ...मी ते देवीला वाहिले...
एकदा रात्री झोपाळ्यावर बसलो होतो...मंद सुगंध दरवळत आला...मी ओळखलं...ही तर रातराणी...झुडुपाजवळ गेलो...परिमल बराच कमी झाला...अंधारात फुले दिसेनात..."आम्ही इथेच बरी"..जणू सांगत होती....." खुडाल तर पस्तावाल..."
पहाटे बाहेर पडलो..उंच उंच चाफा दिसला...पण एक फूल उडी मारून काठीने पाडलंच मी खाली.....दुस-या दिवशी ते पाडलेलं पुष्प लाल पडलं..कोमेजलं...
बाहेर पडलो...तेच झाड...त्यावर कालची सारी फुले टवटवीत होती..सुगंध पसरवत होती..."आम्ही इथेच बरी"..जणू सांगत होती
पारिजात मात्र म्हणाला..."मी अपवाद...ही घे हवी तेवढी फुले..." आणि वा-याच्या झुळुकेने त्याला मदत केली...टपटप सुमने भुइवर पडली...
"आम्ही देवाच्या पायी बरी"..जणू सांगत होती
मधुसूदन थत्ते
१९-०९-२०



Saturday, September 13, 2014

हे नित्याचे...अशीच दिवसाची सुरुवात...
=============================

नेहेमीप्रमाणे पद्मजा काकू साडेपाचला पहाटे उठली...बाहेर पक्षी-कूजन आणि आत काकूचे "कराग्रे वसते लक्ष्मी...आणि ..समुद्रवसने देवी अशी दोन्ही स्तोत्रे म्हणण्याचे स्वर कानावर आले ...भूमिवंदन करून काकू कामाला लागली..

हे नित्याचे...अशीच दिवसाची सुरुवात...

मनात आले हे सोपे असे दोन श्लोक नेमाने आपण का नाही म्हणत?

===============================================
नित्याची सुरुवात....

१ ) मन वीस वर्षे मागे गेलं..मी मुंबईच्या आमच्या हेडऑफिस (Tata House किंवा Bombay House ) मध्ये कामाला पुण्याहून गेलो होतो...

बरोबर ९ ला दहा मिनिटे असतांना एम. डी. साहेब त्यांच्या केबिन मध्ये जाताना पाहिले..

सोबतचा सहकारी म्हणाला..आता दहा मिनिटे दार बंद राहील..कुणीही आत जाणार नाही...

मी प्रश्नार्थ डोळे केले..

उत्तर मिळाले...ते रोज कामाला हात लावण्या आधी गणपतीला वंदन करतात....!!!!
===============================================

२) मन कालच्या घटनेत गेले..

लेडी डेंटिस्टकडे गेलो होतो...पहिलाच सकाळचा मी पेशंट... म्हटलं बोलावतील लगेच...
छे... कसचं काय
दहा मिनिटांनी बोलावले... "काका बसावं लागलं ना जरा...अहो मी देवीचे स्मरण करत होते..."
===============================================

३) वाण्याकडे गेलो...सकाळी नुकतंच दुकान उघडलं होतं त्याने...

"अर्धा किलो साखर दे"...मी..

ह्याचे आपले उदबत्ती लावणे, नमस्कार करणे चालू झाले...

दहा मिनिटाने त्याने माझ्याकडे हसून पाहिले...

रोजची पूजा करत होतो...sorry..जरा थांबावं लागलं तुम्हाला...

मी ह्या सगळ्यात कुठेतरी मागे पडतो आहे का?...कमी पडतो आहे का?

"चहा झालाय...येता ना...?" काकूची हाक आली...

मधुसूदन थत्ते
१३-०९-२०१४



कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना...!!!!!!!!!!

मित्रांनो...ही अत्यंत कोवळ्या अशा भावरंगात न्हाऊन निघालेली अशी लावणी आहे....सुलोचना चव्हाणने सुंदर गायली आहे..

संगीतकार कोण बरं असावं? वसंत पवार की राम कदम ?

ज्या जमान्यात हे प्रथम कानावर आलं ते आमचं वयही ऐन तारुण्यातलं होतं..दूर बनारसला होस्टेल मधे असतांना

एकदा कधी नव्हे ते common रूम मधे रेडिओ माझ्या ताब्यात आला होता आणि मी आकाशवाणी मुंबई शोधत होतो...एका जागी रेडिओचा काटा आणि मी...चांगलेच थबकलो....

"कळीदार कपूरी पान...." अशी भेदक सुरुवात कानी आली...(मुंबई असे सहज लागत नसे तिथे)

इतर मुले मराठी नव्हती...बंगाली आणि `पंजाबी...त्यांना भांगडाच आठवला आणि नाचायला लागली...हुं याहुं याहुं..हुं याहुं याहुं.....

हे सारं मला का आठवलं आज?

कारण ह्या आधी मी ऐकत होतो..."अप्सरा आली..." ही सोनाली कुलकर्णीची अप्रतिम लावणी...

.पण हा बाजच वेगळा....अन "कळीदार कपूरी पान...." वेगळे...

गंमत पहा...लावणी पण सोज्वळ असू शकते हे तुलनेने मला चांगलेच पटले...

मधुसूदन थत्ते
१३-०९-२०१४
https://www.youtube.com/watch?v=CAFTr0frLIo


मधमाशांचे पोळे.... मध आणि मेण
=======================
संशोधक वगळता सामान्य माणसाला ह्या गोष्टी Taken for granted अशा असतात...
आमच्या पारिजातकाच्या झाडाला एक मधमाशांचे पोळे गेले काही महिने होतं...खालीच आमचा झोपाळा म्हणून सुरुवातीला भीती वाटली की चावतील की काय....
पण मग एकमेकांची ओळख होऊन मधमाशा आणि आम्ही गुण्यागोविंदाने राहू लागलो...
परवा लक्षात आलं की मधमाशांना आमचा कंटाळा आला असावा...कारण ते पोळे बिलकुल रिकामे झाले होते...!!!
मग मी धीर केला आणि उंच काठीने त्यावर प्रहार केला...खरेच ते रिकामे होते..
एक तुकडा मी उचलून पाहू लागलो...त्याचा फोटो काढला (इथे तोच दिला आहे.)
काय अप्रतीम रचना दिसली त्या त्यांच्या घराची..!!!
इवले इवले षटकोन..पातळ पडद्यांनी अलग केलेले...पाव इंच खोल ही झाली एक बाजू..अशीच पाठची बाजू...आणि पूर्ण स्ट्रक्चर मेणासारख्या पदार्थाचे..!! हेच मेण की ह्यापासून मेण बनते माहित नाही...
आणि त्या प्रत्येक षटकोनी अशा इवल्या घरात मधमाशा आत बाहेर करतात...मध साठवतात...
निसर्गाची ही धमाल कमाल पाहून आश्चर्य वाटतं..आणि माणसाचा दुष्टपणा पाहून लाज वाटते....
एवढ्या मेहेनतीने त्यांनी साठवलेला हा अमृत ठेवा आपण चोरतो...ते मेण आपण वापरायला घेतो...
का..?
ह्या गोष्टीसाठी आपण काय फक्त मधमाशांवरच अवलंबून असतो का?
मधुसूदन थत्ते
१४-०९-२०१४


Wednesday, September 10, 2014

मी पत्नीला विचारले..." गुलाबपाणी अंगावर टाकतात त्याला शिंपडणेच म्हणतात ना?"
"हो..मग त्यात काय मोठेसे...:" पत्नी
"तसं नाही मला वाटलं दुसरा आणखीन चांगला शब्द असावा..." ..मी..
"का, पण आता फिरायला गेला तेव्हा कुणी गुलाबपाणी शिंपडले तुमच्यावर..."..पत्नी...
"नाही नाही...गुलाबपाणी नाही...माणुसकी शिंपडली..."..पत्नीने विषय दिला सोडून...ती माझ्या जास्त भानगडीत नाही पडत...
झालं काय..एक-दोन अनुभव आज घेतले. तसे किरकोळच...
रस्त्याचा कडेने मी चालत होतो...जवळून मोटारी जात होत्या...अचानक एक स्कूटरवाला एका गाडीच्या मागून रस्त्याचा कडेला आला...मी सिक्स्थ सेन्सनेच अंग चोरून घेतले तरी माझ्या पिशवीला त्याची स्कूटर चाटून गेली...मी मागे वळून त्याच्याकडे पहातच राहिलो...तो जरा पुढे गेला..पण..कडेला स्कूटर उभी करून धावत माझाकडे आला
"काका...लागलं का तुम्हाला? Sorry .." तो
मी नुसता ओठ न उघडता हसलो..त्याच्या नजरेत पाहिलं.. पुन: sorry म्हणून तो गेला...
माणुसकी शिंपडून गेला....
तसाच पुढे गेलो...एक रिकामी खाजगी बस कडेला उभी होती...समोरच्या उघड्या दारापर्यंत मी गेलो इतक्यात आतून एक पानाची पिंक आली अन रस्त्यावर पडली..मी एक इंच जरी पुढे असतो तर माझ्या अंगावरच ती पडती...
मी चमकून आत पाहिले...एक माणूस पाय-या उतरत होता..मला पाहून खूप शरमिंदा झाला...
"साहेब...चुकलो..पुन: बघितल्याशिवाय असं नाही करणार..." तो
"नाही...ड्रायव्हर साहेब...तुम्ही अजूनही चुकता आहात...'पुन: बघितल्याशिवाय असं नाही करणार' म्हणजे बघून असं करणार हेच ना? मग लक्षात घ्या हा रस्ता तुमचाही आहे...तुमच्या गोष्टीवर थुंकणार का??"
आणि मी नुसता ओठ न उघडता हसलो..त्याच्या नजरेत पाहिलं.. Sorry म्हणून त्याने पुन: दिलगिरी व्यक्त केली...
तोही माणुसकी शिंपडून गेला....
माझी फेरी संपत आली होती..एका बंद फाटकाच्या बंगल्यात शिरण्यासाठी एक माणूस आपली मोटर गेट बाहेर थांबवून बाहेर येणार होता...तरूण होता...
मी त्याला थांबवले...
"गाडी बंद नका करू...बाहेरही येऊ नका..मी गेट उघडतो...." अन मी त्याचे काम केले...
केवढी कृतज्ञता होती त्याच्या नजरेत...!!!
मी नुसता ओठ न उघडता हसलो..त्याच्या नजरेत पाहिलं.. Thanks म्हणून तो आदराने हसला..
मी मनात म्हटले मी ही माणुसकी शिंपडली का?
मधुसूदन थत्ते
१०-०९-२०१४
(All pictures mere representative ones.)



Monday, September 8, 2014

ते दोघे सत्तरी पार केलेले असे जोडपे होते.

तुला गीत रामायणातलं कुठलं पद खूप भावतं? त्याने एकदा तिला विचारले...

"सगळीच चांगली ...काय सांगू? हं ते 'पराधीन आहे जगती..' जास्त आपलं वाटतं..." ती ...

"आपलं" ??..त्याच्या प्रश्नाचा रोख तिच्या लक्षात आला....

जरा वेळाने फोन वाजला....बातमी आली..."अमुक अमुक नुकत्याच गेल्या...वय होतं सत्तरीच्या आसपास ..पण तरी मनात येतं ना...'एक चाक निखळल'.."

त्यांनी एकमेकाकडे तात्काळ पाहिलं..दोघांच्याही जे मनात आलं त्याला कुणीच शब्दरूप दिले नाही...

पण जे काम वैखरीने टाळले ते पश्यंती ने केलेच..

ती म्हणाली...

"एवढ्याचसाठी आता स्वावलंबन हवे, शक्य तेवढे...गरजा खूप कमी करायला हव्या...बाह्य गोष्टीवरचे मन शक्यतो कमी करावे... विधिलिखित, जे अटळ आहे, त्यासाठी तयारी हवी...." !!!

त्याला हे माहित तर होते पण ते त्याने स्वीकारले नव्हते...स्वावलंबन आणि गरजा कमी करणे ह्यापासून तो दूर...खूप दूर होता...विधिलिखित, अटळ आहे? काय आहे विधिलिखित?...कोण जाणे?

मग तयारी ती कशी करायची?

हे काही तो बोलला नाही पण पुन: पश्यंतीनेच काम केले...

ती म्हणून गेली..."बाह्य गोष्टीवरचे मन काढावे आणि स्थिर करावे अंतर्मनापाशी...."

तो म्हणून गेला..."चल channel बदलू...संभाषणाचा...."

मधुसूदन थत्ते
०८-०९-२०१४
(स्वतंत्र स्वैर विचार)...............(चित्र प्रातिनिधिक आहे)

गुलबक्षी भल्या प्रहरी मज साद घालसी...
=========================
सकाळी चहा घ्यायचा तो फुलांच्या समवेत...झोपाळ्यावर...छोट्याशा बागेत...हे सुख अनुभवावे....
शिरी पारिजात...क्वचित कधी त्यावर भारद्वाज...बाजूच्या अजस्त्र पिंपळावर कोकिळ-किलकिलाट, इवले इवले पक्षी कोणी चिव चिव करेल कोणी मंजुळ शिट्टी वाजवेल...कोणी असे चोचीतून स्वर काढावे जणू म्हणतात.."तू तर तिथे..मी इथे"....अन तेच तेच कितीदा रिपीट करावे...!!!!
माझ्या दारी नित्य एक जादू होते..
गुलबक्षीचं झुडूप पारिजाताच्या फुलांची ओढणी घेते ...
एकदा मी शेजारच्या चिमुकलीला बोलावले...
"बघ गुलबक्षीला प्राजक्ताची फुले आली आपल्या बागेत..." धावत आली..."काय हो आजोबा..." म्हणाली अन पळाली..
मंद सुगंधी पिवळी जर्द गुलबक्षी....पाहून मोहून जावे....काकू तोडताना खूप काळजी घेते...मला निक्षून सांगते...देठाखालच्या हिरव्या भागासकट तोडा....मला गुलबक्षीची वेणी करायची आहे देवीसाठी...
काय सुरेख वेणी करते पद्मजा काकू...देठ एकात एक गुंफते..वाढवत जाते...मग पूजा करतांना मी त्यालाच फुलाचा हार मानून देवीला घालतो.
अशी ही दारची गुलबक्षी....
वर्षा ऋतूच्या जरा आधी फुलू लागते ती थेट कोजागिरी करून मग लुप्त होते...
पारीजाताला निरोप देते...आम्हालाही सांगून जाते..
"येईन पुढल्या श्रावणात नक्की हं..."
मधुसूदन थत्ते
०९-०९-२०१४
पश्चिमगामिनी माई नर्मदे शांत तुला पाहुनी
वाटते...
अमरकंटकी बोटधार खळखळ रेवा होउनी
ओघवती घनघोर अरण्यां जाशी कशि भेदुनी
हां इथे अशी तू दिसते केवळ अतिव समाधानी
परि जवळी सागर आला पाहुनी जाशी कशि मोहुनी
सहस्त्रार्जुनी सहस्त्रधारा पसरिशि आल्हादुनी
नतमस्तक मी व्हावे देऊ काय तुला वंदुनी..?
मधुसूदन थत्ते
०८-०९-२०१४

Sunday, September 7, 2014

सर्व-संचित सद्भाव सफल होणारच...
विवेकानंदांचे क्षात्र-तेज, डो. हेडगेवारांची तळमळ आणि माणसावरचा विश्वास, लोकमान्यांची स्वराज्याची कल्पना, पंडित दीनदयालांचे बलिदान, गोळवलकर गुरुजींची साधना, शामाप्रसादांची निष्ठा, शास्त्रीजींचे साधेपण...........आणि....मित्रांनो, तुमचे आमचे भाग्य .....
हे केव्हा ना केव्हातरी सफल व्हायचे होते ना...!!
गेल्या १६ मे पासून ते व्हायला सुरुवात झालेली आपण पहातो आहोत....
खारीचा वाटा असेनाका...आपण तो द्यायला हवा....देणार आहोत...
Charity Begins at Home ... मोदीजींनी हे अंगी बाणले आहे...पण एक शिलेदार काय काय करणार..?
वर म्हटलेले सर्व-संचित सद्भाव सफल व्हायचे असेल तर आपल्यापुरते, आपल्या कुटुंबापुरते आपापले अर्घ्य ह्या पुण्यशील प्रवाहात आपण द्यावे...
सत्य, स्वत्व, सदाचार, सत्धर्म, सत्कर्म आणि सत्संगती ह्या सद्गुणांचा अंगीकार आणि प्रसार जितक्या जलद होईल तितकी भारतमाता अधिकाधिक समृद्ध होईल, सक्षम होईल...आणि ख-या अर्थाने वसुंधरेलाच आपले कुटुंब मानेल...
मधुसूदन थत्ते
०७-०९-२०१४





Saturday, September 6, 2014

मित्रांनो.
आत्ताच एक सुरेख भावगीत ऐकत होतो...प्रवास करून आलो १९५८ सालाचा ...
माझा मलाच आज विश्वास बसत नाही की हे गीत मी सर्वांसमोर एका समारंभात गायलो होतो ...!!!!
किती सहज अन तरलतेने हे आपल्याला "अस्फूट भावनांच्या स्वप्नात" नेते...!!!
अन सुरुवातीची तान ऐकायला चुकू नका...स्वरांच्या अशा काही श्रीमंत आलापीचा लेप मनावर लता दीदी घालते...
व्वा..
किती सुंदर शब्द...किती मधुर असा लताचा स्वर...!!!
प्रियकराला साद देताना ही अधीर झालेली तरुणी म्हणते...
"पुष्पात गंध जैसा ..गीतात भाव तैसा...
अद्वैत प्रीतीचे हे मम जीवनी असावे...."
ऐका तर मग....
मधुसूदन थत्ते
२७-०२-२०१४
इथवर येउन पोहोचलो...वाटही संपत आली आणि दिवसही..!!!

बस्स..कांही मिनिटात व्हावा सूर्यास्त..प्रतीचीला रंगपंचमी तर केव्हाच सुरु झाली आहे...

दूर लांब एक छकडा दिसतोय...त्यालाच तर पार करून आलो इथे..

गाडीवान निद्रिस्त होता...पण बैलाला रस्ता परिचित होता...छकडा लपकत होता...चाके वंगणाला कित्येक दिवस पारखी होती..वाकडी अशी फिरत होती आणि आवाज करत होती..कुई कू र्र कॉ कॉ...
त्या वातावरणात ह्या छकड्याने भीषण सुस्ती पसरवली होती...म्हणून तर मी झप झप पुढे आलो आहे...

मी स्वत:कडे पाहिले...माझा छकडा इथवर आणला...कर्तृत्व निद्रिस्त होणार? शरीरधर्माला आयुष्यक्रम परिचित आहे... हाही छकडा आता लपकतोय...पाय बोलायला लागले आहेत...पण ह्या "छकड्याने" मनाची सुस्ती अजिबात पाहिली नाहीये अजून तरी...

आयुष्याच्या वाटेवर झप झप पुढे तर आलो...पण कुठवर जाऊ? वाटही संपत आली आणि दिवसही....!!!!!!!

मधुसूदन थत्ते
३०-०१-२०१४


Sunday, August 17, 2014

सागर लाटा....किती अधीर व्हाव्या किना-याला भेटायला...!!

पण...नववधू प्रमाणे "लाजते पुढे सरते, फिरते..." असे का बरं करतात?


दूर क्षितिजापाशी आणि त्याही पुढे लाटा रूप घेतात मर्दानीचं...जसं .. डोलकर म्हणतो..

"या हो दरियाचा दरियाचा दरियाचा दरारा मोठा...जवा पान्यावरी उठतांना डोंगर लाटा लाटा लाटा..." !!!

जलद घनश्याम मेघ पर्वत राशीच्या भोज्ज्याला स्पर्शून ह्या रात्नाकाराला भेटायला येतात तेव्हा किना-यावरल्या आम्हा पर्यटकांना ती एक पर्वणी वाटते...

मनात येतं, घ्यावी नाव आणि जावे ह्या लाटा पार करत ...ऐकू तरी हे घन काय संवाद करतात सागराशी...!!!


Thursday, August 7, 2014

हा चुरा विजेचा अंतराळी विखुरला.
की कांड अग्नीचे व्यापितसे गगनाला?

जन्मा का येई एखादा नव तारा ?
की मृत्यु कुणा ता-याचा हा सामोरा 

जन ह्याला म्हणती नक्षत्राचे देणे
परि हे तर मजला वाटतसे देखणे...

(चित्र इ-मेल द्वारे मिळाले)

मधुसूदन थत्ते
०७-०८-२०१४


Wednesday, August 6, 2014

मित्रांनो,
आज गुरुवार....त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचे स्मरण...
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

कोण्या कवीने ह्या देवाचे वर्णन काय सुरेख केले आहे पहा...

हे छोटेसे भजन मी लहान असताना माझ्या काकांनी दर गुरुवारी म्हटलेले ऐकले आहे आणि पुढे मी म्हणत असे. भैरव रागात बांधलेलं हे भजन मी अजूनही पेटीवर वाजवत असतो...

वर्णन तर पहा...सोबतच्या चित्रात दत्तमूर्ती त्याच रूपात आपण पहावी...पूर्ण भजन स्कॅन करूनही दिले आहे खाली..(चित्र डॉ. दिलीप साठे ह्यांच्या बहुमोल ग्रंथातून घेतले आहे. ग्रंथाचे नाव आहे: "श्रीगुरुचरणतीर्थ")

हा परम सनातन विश्व भरूनी उरला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला

हा देवही आणि ऋषीही...कसा ते पुढे वाचा...

स्मित रम्य वदन, काषाय वसनधारी...
पीयूष युक्त करि रत्न जडित झारी...
निज भक्तत्राण कारणी शूल धरिला ...!!!!

पहा काय शब्द आहेत सुंदर...

पुढे कवी म्हणतो....

बांधिला टोप मुरडुनी जटा मुगुटी...
घातली दयाघन माला दिव्य कंठी
करधृत डमरूतुनि उपजति ज्ञानकळा...

किती अप्रतीम वर्णन केले आहे कवीने...!!!!

श्वानरूपी श्रुती आणि कलीला घाबरून जवळ असलेली भूधेनु... ह्या मृगचर्म पांघरलेल्या आणि हाती शंख चक्र असलेल्या भगवंतापाशी वावरत आहेत..

स्वजनांच्या रक्षणाला तत्पर अशा ह्या भस्म लेपलेल्या देवाच्या झोळीत जन्म-मरण पिगा घालतायत..युगे आली गेली...येणार जाणार...

अशा ह्या नारायणाच्या हृदयी भक्त-प्रेम रंग भरून-व्यापून उरला आहे....भक्तांनो...पहा..जरा ध्यान करा जरा...!!!!!!!!

मधुसूदन थत्ते....
०७-०८-२०१४
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

हा परम सनातन विश्व भरूनी उरला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

बांधिला टोप मुरडुनी जटा मुगुटी...
घातली दयाघन माला दिव्य कंठी
करधृत डमरूतुनि उपजति ज्ञानकळा..
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

मृगचर्म पांघरी शंखचक्र हाती
श्रुती श्वानरूप घेउनी पुढे पळती
भूधेनु कलिभये चाटित चरणाला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

करि स्वजन उपाधी भस्म लेप अंगा
झोळीत भरी तव जन्म मरण पिंगा
नारायण हृदयी रंग भरूनी गेला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

Sunday, August 3, 2014

मित्रांनो अक्षतृतिया आली त्या निमित्त ह्या एका कर्तृत्ववान आई बद्दल थोडेसे...

१४ व्या वयात लग्न १९३० सालचे...शिक्षण मराठी सातवी भुसावळला...त्यानंतर शाळा-कॉलेज अजिबात नाही..आणि वयाच्या नवव्या दशकात बाई पालखीवाला यांचे "We the people " वाचून संपवते...लाला यांचे "Creation of Wealth" हे TaTa उद्योगावरचे पुस्तक वाचून काढते..काय ही जिद्द..!!

संसाराच्या चक्रव्यूहात स्व-उन्नती अजिबात बंद पेटीत ठेवणा-या गेल्या शतकातल्या काही बुद्धिवान स्त्रियांना हा असा त्याग करावा लागला...
एकत्र कुटुंबाचा किंवा वडिलकीचे आधिपत्य असणा-या, विभक्त कुटुंबाचा फायदा...पेक्षा जांच ह्याना जास्त जाणवला...
स्वत:च्या मुलाला उच्च शिक्षणाची संधी मिळणे अशक्य उलट कारकुनी करावी लागणार हे पाहिल्यावर ही माता विनम्रपणे पतीसह स्वतंत्र निर्णय करायला सिद्ध झाली.

क्षणाश:कणशश्चैव विद्यामर्थंचसाधयेत
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनं

ही उक्ती ही आई अक्षरश: अखेर पर्यंत जगली.

८९ वर्षाच्या आयुष्यात हिला कधी को कोणी स्वस्थ बसलेली पाहिलीच नाही...टीव्ही बघता बघता हातात काही काम असेल...
पुड्यांचे दोरे एकत्र करून हिने गुंडे करावे.."दोरे लागतात असे खूपदा" म्हणायची.
लाल भोपळ्याच्या बिया एक एक करत सोलून ठेवायची...
वयाच्या ८५ वर्षापर्यंत मुला-नातवंडांचे घरातले कपडे हिने शिवले...१९४९ साली मुंबईच्या एका विख्यात शिवण क्लास मध्ये पहिला नंबर मिळवून तिच्या साठी कौतुकाने पतीने आणलेले त्या काळचे १४९ रुपयांचे सिंगर मशीन आज २०१३ मध्ये सुद्धा चालते आहे.
१९८५ च्या पती-निधनानंतर तिने योगासने शिकायला सुरु केले..घराच्या छोट्याशा बगिचात अनेक प्रयोग केले...आणि अगदी २००५ च्या १४ ऑक्टोबर ह्या अखेरच्या दिवसापर्यंत ती बगिच्यात जेवढे जमेल ते काही ना बाही करत राहिली...
अखेरच्या दिवशी, स्वत:चे कपडे सुद्धा ह्या अनुकरणीय मातेने धुतले...
हे स्वावलंबन

ही चिकाटी

हा आत्मविश्वास

ही जिद्द

यमराजालाही प्रश्न पडला असेल...

मित्रांनो अशी होती हो माझी आई....अक्षतृतिया हा तिचा वाढ दिवस होता बरं...

मधुसूदन थत्ते
अक्षतृतिया २०१३

एकदा असेच सफरचदांच्या मळ्यात गेलो...अशी लगडलेली होती फळे प्रत्येक झाडाला...असंख्य झाडे...बुटकी...साधारण आठ-दहा फूट उंच... पण हिरवी, लाल, पिवळी, शेंदरी...सफरचंद अगदी भरपूर...

मी हावरट झालो आणि बागेत शिरतानाचा फलक पाहून स्वैरही झालो..

"कितीही तोडा आणि खा पण घरी न्यायची असतील तर गेटपाशी दाखवा..."

लहान मुले. तरूण मुले-मुली, वृद्ध माणसे...दिसली पण झाडेच इतकी होती की माणसे तुरळक वाटावी...

मधुसूदन थत्ते
२६-०६-२०३


अथांग दरिया, विनवि किना-या, कौतुक माझे करिसी 
चरण-स्पर्श नित करीतसे मज आशिर्वचने देसी 

दिनकर मग जाताना वदला पाहतसे मी नित्य
तू हळू हळू धरतीला तिथल्या बळकाविसि हे सत्य. 

(Scene borrowed from Sumedha Bhat )
मधुसूदन थत्ते


हे दृश्य पाहिलं आणि वाटलं लग्गेच टाकावं सावध पाऊल त्या छोट्या होडीत आणि मारावी वल्ही सपासप...
जावे क्षितीजावेरी आणि पहावे डोकावून खाली..पलिकडे आहे तरी काय...!!
भेटेल एखादा मत्स्यावतार आणि कळेल हे दशावतार कसे कसे प्रगट झाले....
नको...पण...त्यापेक्षा...
विचारावे ह्या पर्वताला..."आमचा हिमालय माहित आहे का तुला? नाही ? मग आमचा विन्ध्य? मेरू? लाडका सह्याद्री?
विचारावे ह्या जळाला..."आमचे मानसरोवर माहित आहे का तुला? नाही?
मग गंगाजल ? नर्मदेचा अवखळपणा ?
आणि..
त्यांची "नाही बुवा" अशी उत्तरे अपेक्षित होतीच.

मधुसूदन थत्ते
२४-०६-२०१३


आजचा दिवस मोठा भाग्याचा...

कन्येच्या नव्या इमारतीची वास्तुशांत असणे हे तर पवित्र असे कारण होतेच पण त्या निमित्ताने चार विद्वान वेद-शास्त्र पारंगत अशा पुरोहितांशी झालेला संवाद हे त्या भाग्याचा भाग आहे...

चारही जण नव्या पिढीचे आहेत...अस्खलित वाणी आणि वेधक अभिव्यक्ती हे त्यातल्या प्रमुख पुरोहितांचे वैशिष्ठ्य. 

त्यांच्यात कला भरभरून दिसली. मांडणी..मग ती वास्तूकलशाची, ग्रहमंडळाची किंवा पुण्याहवाचन मंचकाची असो...त्यात सुरेख कला दिसली...प्रत्येक विधीची माहिती मोठ्या आनंदाने आणि कुठेही अंध-श्रद्धेचा वासही नसावा अशी त्यांनी दिली...

"यज्ञात राक्षस विघ्न आणायचे" हे सांगितल्यावर..."अहो हे राक्षस कोण? आपलेच षड्रिपू..." अशी टिप्पणी करायला विसरले नाहीत.
पुढे ते म्हणाले...
"मंत्रोच्चाराने..ह्या यज्ञाच्या पसरलेल्या औदुंबर-समिधाच्या धुराने वास्तूवर चांगला परिणाम होतो हा अनुभव आहे..राहत्या माणसाना शांती-पुष्टी-तुष्टी मिळते हा अनुभव आहे..".

ह्याहीपेक्षा मला अतिशय भावले ते त्यांचे अभिजात गायनाचे पारंगत असणे....मध्ये दोन वेळा त्या प्रमुख पुरोहितांनी दहा-दहा मिनिटे गणेशाची आणि वास्तूपुरुषाची आराधना केली ती खास रागधारी गाण्याने...!!!

ही आजची पुरोहितांची नवी पिढी...अभिमान वाटावा असे आहेत हे विद्वत्जन....

म्हणूनच सुरुवातीलाच म्हंटले..."आजचा दिवस मोठा भाग्याचा"
 — 
का फटकारिसि सौदामिनी अवनीला तू ?
कोपली अशी का? काय मनी तव किंतु?

कापती थरथरा अधर धरणी चे देवी
तू मेघा भेदुनि कल्लोळा तव दावी 

ते मेघ त्वरे देती तुज करुनी वाट
गगन भेदी घन आक्रोषती सुसाट

ही सृष्टी चराचर भयकंपित मग झाली
ही प्रलयंकारी स्थिती सभोती झाली

(वीज निघाली अवनिकडे)
मधुसूदन थत्ते


ह्या आईच्या डोळ्यातले कौतुक बघा कसे ओसंडून वाहते आहे.... 
ही निरागस धिटुकली काय बरं सागत असावी आईला...
बघा कोणाकोणाला काय सुचतंय ते.

नगराज म्हणू की कुंभकर्ण निजलेला?
किती युगे पहुडला माहितही नच त्याला 

कलियुगात जर हा आत्ता जागा झाला
शोधील चहूकडे सोन्याच्या लंकेला..

Tuesday, July 15, 2014

ट्राम...
======

केवढे आकर्षण होते मला ट्रामचे..
खोदादाद सर्कल (म्हणजे दादर टी टी ) ते बोरीबंदर तिकिट एक आणा...(तेव्हा नवे पैसे नव्हते अस्तित्वात)

मी होतो तेरा वर्षांचा..जात असे ट्रामने कधीकधी शाळेत...ग्रांट रोडला...Lamington रोडला उतरायचं..पाच मिनिटावर Robert Money शाळा..

एकदा ट्रामच्या ड्रैव्हर च्या अगदी लगतच्या सीट वर होतो..फारशी काय..अजिबातच गर्दी नव्हती..

उठलो आणि त्या फेटा बांधलेल्या ड्रैव्हर चा शेजारी गेलो..

"मी राहू का इथे उभा जरा वेळ" अशी परवानगी मागितली..

काय मज्जा आली तेव्हा..!!

त्याच्या हातात एक लिवर होती..ती तो हलके ह्या त्या बाजूला फिरवून वेगावर नियंत्रण ठेवायचा (खूप पुढे कळले की त्यामुळे तो सिरीज मोटर चा current कमी जास्त करायचा.)

त्याच्या पायाखाली एक बटन होतं..ते दाबून ती टिंग टिंग अशी घंटी वाजवून मार्गावरल्या लोकांना सावध करायचा...काचा बिचा कुछ नही सगळा मोकळा व्यवहार..अन हा उभाच्या उभा..

रस्त्यावरचे लोकसुद्धा आरामात रस्ता क्रॉस करायचे...हे एवढे धूड येताय ह्याची त्यांना परवा नसायची..accident तसे नाही व्हायचे... .

मग stop आला की मी चालत्या ट्राम मधून उतरत असे..मला होती ती सवय...

बोरीबंदरला ट्राम पुन: परतायची..त्यासाठी कंडक्टर खाली उतरायचा...ट्राम च्या शिरावर एक लांब दांडी असायची. तिच्या टोकाला एक चाक..जे रस्त्यावर कायम तोरण बांधल्यागत खोदादाद सर्कल ते बोरीबंदर अशा असलेल्या केबल वर जाऊन बसायचे...circuit complete व्हायचे...

तर हा कंडक्टर ती लांब दांडी हाताने ओढून विरुद्ध दिशेला आणायचा...झाली reverse गतीची तयारी..

मग टिंग टिंग केलं की ड्रैव्हर माघारी खोदादाद सर्कलला जायला निघायचा,,

मित्रांनो असे होते आपल्या मुंबईच्या commuting चे साधे सोपे आणि स्वस्त रूप..

आज ट्राम हव्या होत्या नाही का? कलकत्त्याला आहेत ना अजून...

मधुसूदन थत्ते
११-०७-२०१४



तेव्हा आणि आज...

काळाने मलाच माझ्यापासून किती दूर न्यावे...!!!

पन्नास वर्षे हा पूल इथे असाच आहे...ते आभाळ...तेच आहे...मी मात्र तेव्हा दूर क्षितिजापार जाईन म्हणाले...
आज पण क्षिताजापार जाईन म्हणत्ये..

पण ..तेव्हाचे क्षितीज वेगळे होते...आजचे वेगळे आहे..

तेव्हाच्या क्षितिजाला ऐलतीर पण होते आणि पैलतीर पण होते

आजच्या क्षितिजाला फक्त पैलतीर आहे..

तेव्हा मी जमवत होते…हे..ते...आणखी तिकडचे..मग हा विचार...तो विचार..त्यापलिकडचा विचार..
पण
आज मी एक एक करत सोडून देते आहे...टाकून देत आहे...मोकळी मोकळी होत आहे...रिकामी होत आहे..

हो मनातले विचार सुद्धा काढून टाकत आहे...

आज ते जमतय...तेव्हा ते जमणं अशक्य होतं...

मधुसूदन थत्ते
१२-०७-२०१४


कोमल रिषभ...तीव्र मध्यम 
===================

कमला तशी तिच्या आईबाबांजवळ खेड्यात फारशी राहिली नव्हती. दहा वय झालं आणि शिक्षणासाठी पुणे-मुंबई अन नंतर अमेरिका.त्यामुळे गावाच्या स्मृती तेवढ्याच. पण पाटी कोरी असते ना तेव्हा...अजून उमटलेलं पुसलं नव्हतं गेलेलं..

धनिक जमीनदाराची ती लाडकी एकुलती एक कन्या... 

बालपणीच्या वास्तव्यातल्या दोन व्यक्ती तिच्या मनात कायम घर करून राहिल्या..
एक पंडित शिवराज व्यास...गायन मास्तर 
आणि 
दुसरे बाबूमामा ...जे दिवसभर कमलाच्या घरीच असायचे..तिला गाणी म्हणून दाखवायचे..गोड गोष्टी सांगायचे...

व्यासांनी सांगितलेल्या काही गोष्टी संगीताशी निगडित होत्याही आणि नव्हत्याही...तिला ते चिमणी म्हणायचे..."हं दाखव गाऊन" ऐवजी "कर बघू आता तुझी चिव चिव" म्हणायचे..

"चिमणे...यमन रागाचं काय वैशिष्ठ्य?"

"गुरुजी..त्यात दोन्ही मध्यम येतात..एका साधा अन दुसरा तीव्र..."

नाही..आरोहातला "म" अवरोहात तीव्र होतो"..गुरुजी..

मग म्हणायचे 

"पोरी इतरत्र जसे तसेच संगीतातही तीव्र स्वर असतो बरं."

आज वयाच्या बाविसाव्या वर्षी कमला खेड्यात परतली होती..१-२ महिने रहाणार होती..१६ वर्षांनी इतके रहायला मिळणार होते.

पहिल्या आठवड्यात ती व्यास गुरुजी आणि बाबूमामा..दोघांनाही लगेच भेटून आली..दोघेही १६ वर्षांचा भार शिरावर घेऊन जरा वाकल्येत हे दिसले तिला.

गुरुजींनी ती पुढे गाण्यात काय काय शिकली हे जाणून घेतले आणि बाबूमामा तिच्या माथ्यावरून हात फिरवीत आशीर्वाद देत तिला म्हणाले होते..

"बबडे , अजून गोष्टी सांगू का? निजतांना गाणे म्हणू का"

दहाएक दिवस उलटले असतील..एकदा वाड्यात बाबांनी चार दोन लोकांना शेतीबद्दल काही सांगायला बोलावले होते. कमला बाजूच्या खोलीत वाचत बसली होती..

मिटिंग झाली..सारे गेले आणि एकटे बाबूमामा आणि बाबा राहिले..

"बाबुराव..केव्हा अक्कल येणार तुम्हाला?" बाबा असे रागावलेले तिने कधीच पाहिले नव्हे..ती हळूच भिंतीपाशी जाऊन ऐकू लागली.

"नांगरणी व्हायलाच हवी..कारण पुढे करू नका..आधीच गेला आठवडा वाया घालवलात..."

"धनी, बैलाचा पाय दुखावलाय..पण लावीन त्याला नांगराला..फक्त अजून चार दिवस द्या.. होईल पाय तेवढ्यापुरता बरा..." बाबूमामा

"बाबूराव अखेरचे सांगतो..उद्या नांगरणी सुरू झाली नाही तर ह्या घरात पुन: तुम्ही यायचे नाही. आत्तापर्यंत तुमच्या पुष्कळ चुका आम्ही नजरेआड केल्या..इथून पुढे नाही..." बाबा असे म्हणून फणका-याने बाहेर निघून गेले..

कमलाने सारे ऐकले होते. बाबूमामांची हकालपट्टी तिला सहन होणे शक्यच नव्हते..तिने बाहेर येऊन जणू काहीच ऐकले नाही असे दाखवत सहजच म्हटले, "मामा, उद्या मी येऊ का शेतावर? मला पाहायचं आहे सारं 

"कमलाताई...उद्या नको..मी नेईन तुम्हाला नंतर..."बाबूमामा

"मामा...हे कमलाताई काय? आणि मला अहो जाहो? मामा मी तुमची बबडी ना?" कमला म्हणाली

बाबूमामा काहीच न बोलता एकदम निघून गेले.

दुसरा दिवस उजाडला...सकाळीच कमला आईला सांगून बाहेर पडली.."आई, आज किती छान हवा पडल्ये...मी जरा नदीकाठची शोभा पाहून येते..."

कमलाने नंतरचे दोन तास कसे अन कुठे घालवले..कुणाच्या ध्यानी येण्याचं कारणच नव्हतं..

सुमारे दहा वाजता ती त्यांच्या शेतावर गेली..

जे पाहिलं त्याने तिला फार मोठा धक्का बसला...

एका बाजूला बैल अन दुस-या बाजूला बाबूमामा...नांगराला जुंपले होते आणि नांगरणी सुरू करणार होते...!!!

डोळ्यातला पाणी पुसत धावत ती तिथे पोचली.. बाबूमामांना रागावली..

"मामा..हे काय करताय? बाहेर या आधी..."

"ताई...बैल नाही चालत हो...अन आज नांगरणी झाली नाही तर धनी मला पुन: घरात घेणार नाहीत... 

कमलाने उंच हात करून हाक मारली...धोंडीबा...लगेच या...

व्यासगुरुजींच्या शेतीचे बैल घेऊन त्यांचा धोंडीबा दुरून येतांना दिसला...

संध्याकाळच्या सभेवर बाबा, बाबूमामा आणि चार दोघे जमले होते

"बाबूमामा... टिकलात तुम्ही कमीतकमी अजून काही दिवस...असं ऐकतो आहे की आज नांगरणी केलीत तुम्ही.."

"हो धनी...देवाच्या कृपेने आज नांगरणी झाली..." इतक्यात कमला आतून बाहेर आली. तिने बाबूमामांना "चूप रहा" असे बोटाने खुणावून सांगितले..

तसं नवीन काहीच नव्हतं सांगा-ऐकायला...गेले सारे..बाबाही बाहेर गेले.

इतक्यात आईची हांक आली

"बाबुराव हे घ्या चार घास खाऊन जा...आणि हे घरी न्या मामीसाठी...आज माझे अष्ट-मंगळवाराचे व्रत संपले..गोड भात केला आहे"...

बाबूमामा आत आले खरे पण अचानक त्यांनी हम्बरडाच फोडला..

"यमे.. अगं भाग्यवान गं मी...मला किती गोड नात दिलीस...!!!"

आईला काहीच उमगेना...कमलाने मग सारा वृत्तांत सांगितला..व्यास गुरुजींनी तात्काळ बैल द्यायला कसा होकार दिला ते सांगितले..

जेवण उरकून शांत मनाने बाबूमामा घरी गेले..कमला आणि आई दोघीच होत्या आता तिथे..

"आई एक सांग...तुला त्यांनी 'यमे' कसे म्हटले? आणि मी काय त्यांची नात???"

आई उत्तरली..

"कमळे, बाबूमामा हे खरे माझे सावत्र मामा आहेत बरं..."...!!!!!!!

कमलेला आत्ता व्यासगुरुजींचे एक वाक्य आठवले..
"चिमणे...तीव्र ऐवजी कोमल स्वर नेहेमी जवळ करावे...जसा यमनला कोमल रिषभ कसा हळूवार करतो आणि पूरिया कल्याण तयार होतो..."

मधुसूदन थत्ते
१५-०७-२०१४