Saturday, May 29, 2021

 हिम नग हा दिसतो जितुका वर

असे कितितरी खोल खोलवर

मातृत्वाचा जिव्हाळा जणु
थांग तयाचा कसा मी जाणु ?

पितृप्रेम हे असे खोलवर
जाऊ नका जे दिसते वर वर

मधुसूदन थत्ते
२३-१२-२०१२
************************************

रे मयुरा तव हरित पिसारा आज कुठे गेला ?
हे विरळा की तुझ्या वयाचे लक्षण म्हणू याला ?

सौंदर्य परी देवाने दिधले सहस्त्र नयना तुजला
वृद्धत्व असो वा नसो, वर असे कायम हा तुजला

मधुसूदन थत्ते
२१-१२-२०१२
**************************************

एक कर्तृत्वसंपन्न जीवन आज अनंतात विलीन झाले.

काव्य-शास्त्र-विनोदेन श्रीमंत, अत्यंत समाधान पावलेल्या आणि संतुष्ट अशा नव्वदी पार केलेल्या कुसुमताई गोखले आज काया-वाचा-मने आपल्यात नाहीत पण अन्यथा सर्वार्थाने आपल्या मनात आहेत

व्यक्तिश: मला तर मातेसमान अशा कुसुमताई आणि माझी आई मैत्रिणी होत्या अनेक वर्षे.

सात वर्षांपूर्वी आई गेली...आज कुसुमताई...

दोघींची विचार छाया आमचा आधार आहे. किती, काय आणि कसे निघून जाण्याआधी परंपरेने पुढे सोपवायचे आहे ते शिकवून गेल्या. हेच तर त्या विचारधारेचे बीज आहे...रुजते अआहे आमच्या मनात...

कुसुमताई तुमच्या स्मृतीला शतश: वंदन.

मधुसूदन थत्ते
१३-१२-२०१२ 
Se

 घे अर्घ्य तुला आदित्या प्रभात झाली

तव किरणे भेदुनि नभांगणाते आली ।।
ही गंगा भागीरथी वाही काशीला
मम शिक्षणस्थळ; कारण हे मम भाग्याला ।।

(माझ्या विश्व विद्यालयाला स्मरून)
मधुसूदन थत्ते

०३-०१-२०१२

 माणुसकी हरवलेल्या आजच्या जगात २५ वर्षाचा एक तरुण पोलीस ऑफिसर जेव्हा माणुसकी जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या त्या कृतीचं जगातील लाखो लोकांना कौतुक वाटतं. अभिनंदनाचा आणि ख्रिसमस गिफ्ट्सचा त्याच्यावर वर्षाव होतो. तेव्हा बिचारया ल्यारी डिप्रिमोला मात्र प्रश्न पडलाय कि आपण इतकं मोठ काय केलय ज्यामुळे सारया जगाला आपलं कौतुक वाटावं ? धन्य ती माता जिने ल्यारी डिप्रिमो सारख्या सहृदय मुलाला जन्म दिला.


नोव्हेंबर मधली एक थंडगार रात्र. २५ वर्षाचा तरुण पोलीस ऑफिसर ल्यारी डिप्रिमो न्यूयॉर्क शहराच्या टाईम स्क़्वेअर विभागात ड्युटीवर होता. दोनच वर्ष झाली होती त्याला न्यूयोर्क पोलीस डिपार्टमेंटमध्ये येऊन. सगळी हालहवाल ठीक आहे न हे बघायला त्याच्या पोलीस कारमधून चक्कर मारत होता. त्याची नजर एका माणसावर पडली. त्या माणसाचे पाय उघडे होते. त्याच्या पायात साधे मोजे देखील नव्हते. " बिचारा ! किती थंडी आहे आज. असल्या थंडीत त्याचे पाय गारठून जातील. "ल्यारीचे मन
कळवळले. गाडी थांबवून तो त्या माणसाजवळ गेला. तो नशेत नाही न बघितले. त्याने त्याची निट विचारपूस केली. ५५ वर्षाचा तो माणूस अमेरिकन लष्करातील माजी जवान होता. बोलायला चांगला वाटला. पायात बूट का नाही विचारल्यावर त्याचे कारण तो सांगू शकला नव्हता. काहीतरी उत्तर बरळला. तुला मोजे आणून देऊ का असे ल्यारीने विचारल्यावर नको रे पोरा. पण विचारल्याबद्दल थ्यांक्स आणि ग्वाड ब्लेस यु म्हणाला.

ल्यारीला काहीतरी वाटून तो उठला. त्याच्या बुटाची साईज विचारून ल्यारीने गाडी एका बुटाच्या दुकानाजवळ नेली. तिथल्या माणसाला सांगितलेल्या नंबरचे विंटरचे बूट्स विकत द्यायला सांगितले. ल्यारी ते बूट घेऊन पुन्हा त्या माणसाकडे गेला. व त्याने आपल्या हातानी ते बूट त्या माणसाच्या पायात घातले. हि गोष्ट कोणाला कळलीही नसती. पण नेमकी त्याच वेळी जेनिर फोस्टर नावाची टुरिस्ट बाई हातातल्या कॅमेऱ्याने न्यूयॉर्क शहराचे फोटो काढत होती. तिला तो अनवाणी माणूस दिसला होता. ती त्याला पैसे द्यायला जातच होती तेवढ्यात तिच्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात ते दोघे आले. एक पोलीस एका अनवाणी माणसाजवळ बसून त्याच्या पायात बूट घालत आहे हे पाहून तिने घडत असलेले दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टेप केले. व एका दयाळू पोलीस ओफिसरने न्यूयॉर्कमध्ये केलेल्या मदतीची कथा असे लिहून न्यूयॉर्क पोलिसांच्या वेबसाईटला पाठवली. व स्वतःच्या फेसबुकवरही टाकली. तिने त्या चित्रीकरणाखाली लिहिले होते - माणुसकी आजही जिवंत आहे हे पाहून माझे मन भरून आले आहे. मला त्या पोलीस ऑफिसरचे नाव माहित नाही पण कृपया त्याला कोणीतरी कळवा.

वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने ती मदत कथा घराघरात पोहोचली. जग बदलायला एकाच माणूस पुरतो, माणसातला देव सगळीकडे असतो अशा प्रतिक्रिया त्यावर उमटल्या. न्यूयोर्क पोलिसांच्या साईटवर त्या बातमीला तब्बल ६ लाख लोकांनी लाईक केले तर ४७ हजार लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ल्यारीच्या एका मित्राने जेव्हा हि बातमी त्याला सांगितली आणि मिडीयावाले त्याच्यावर तुटून पडले तेव्हा ल्यारीला अक्षरशः गोंधळल्यासारखे झाले होते. आपल्या त्या कृतीचे सारे श्रेय त्याने आपल्याला लहानपणी चांगले संस्कार देणाऱ्या आपल्या आईला दिल

Wednesday, May 26, 2021

 माझा पारिजात ...

***************
मागल्या वर्षी वर्षा ऋतू आला आणि पारिजात खुलला-फुलला-भरभरला...ते अगदी हेमंताच्या मध्यापर्यंत....
दारी सड्याची रांगोळी रोज सकाळी पाहावी...झाडाने नम्रपणे सुचवायचं "इथे जरा जपून या..."
मग मी फुले गोळा करत करत वाट मोकळी करत पुढे पाऊल टाकत जायचा... गोळा करतांना वा-याच्या झोतात माथ्यावर पुष्पवृष्टी व्हायची. मनात यायचं माझ्या झाडाला कुठे माहीत मी कसा आहे....पण आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते असं देत राहावं हेच सुचवायचा ह्या वृक्षाला...
हेमंत ऋतू पावलापावलांनी पुढे येत राहिला आणि माझा प्राजक्त दिनप्रतिदिन सांगत गेला..."देवपूजेला देईन थोडी फुलं पण फुलांनी घट्ट धरून ठेवलंय जागोजागी...तुला ती खुडावी लागतील..."
कुठे श्रावणातला भुईभर सडा अन कुठे हे माघातलं वास्तव.....कधीही न मोजता यावी अशी ह्याची फुले आता अगदीच अल्पसंख्य झाली...वारा सुटला तरी फुलं काही सुटत नाहीत पानापासून अलग...
पण...
सृष्टीचा हा नियम आहे....ऋतुचक्राची ही जादू आहे....
भारद्वाराज आला...चंडोल आला....म्हणाले बघ आता वसंत येईल...कोकीळ येईल....पोपट येतील..
पण हा वृक्ष खरा फुलेल तो ग्रीष्मानंतर...
पहिल्या मेघश्यामाला पाहून....कुठे कानी आली तर मोराची केका ऐकून त्या मयुराप्रमाणे हा थरथरेल आणि बघशील भिरभरत फुले खाली येतील...सडा आणि मृदगंध पाहून वारा सुटेल आणि सर्वदूर परिमल पसरला जाईल...
भारद्वाराज आणि चंडोल दोघांनी ४ महिने थांबायला सांगितलंय...
वाट पाहीन...
मला माझा पारिजात खूप खूप फुललेला हवा आहे...
मधुसूदन थत्ते
१०-०३-२०२१
*******************************************************

आजची प्रसन्न संध्याकाळ
तसं आभाळ भरून आलं होतं दुपारपासून...बाहेर अंगणात खुर्ची टाकून आभाळाकडे नजर लावून बसलो होतो....
परिसर दुधी झालेला मला आवडला...झाडांनाही नक्की आवडला असावा...पुष्पहीन पारिजात खूप हलला ...पडली फक्त शुष्क पानं..
आलाच..एक थेंब आलाच माझ्या डोक्यावर...
मी म्हंटल...येरे येरे पावसा, ये ना रे पावसा...
ऐकलं त्याने माझं..मला खुर्ची घेऊन आत जायला लावलं त्याने...
आणि मग...
असा काही भरकटत धरतीला भेटाया आला की काही विचारू नका...
सर्वदूर मातीचा सुगंध बहुतेक त्याला उधळायचा होता...
एक खेळी खेळून गेला..
आता माझी खेळी...
पटापट १-२ फोटो काढले...ऐन पावसात...कॅमेरा भिजला जरासा..
so what ? फक्त तो मृदगंध मात्र आला नाही फोटोत,,,,
again ...so what ?
मधुसूदन थत्ते
२१-०३-२०२१
फोटो मीच काढला आहे
*******************************************
फुलांचे बोल...
************
"चाफा बोलेना".........खूप काळामागे कवी बी (नारायण गुप्ते) ह्यांनी एक सुंदर गाणे रचले...पुढे ते लतादीदींच्य सुंदर स्वरात आल्यावर आपल्या सर्वांच्या तोंडी कायम बसले...
का बरं चाफा बोलेना..?
कवीच्या मनात खूप काही असेल पण फुलांचे बोल ही कल्पनाच मला खूप जवळची वाटली...
माझ्या बागेतली फुलं रोज माझ्याशी बोलतात...एकतर्फी असतं ते बोलणं...
पारिजात जेव्हा वर फांदीवर असतं आणि हळूच निसटून परडीत येतं ते फांदीला म्हणतच..."निघते रे..जाईन देवाच्या पायाशी अन येईन उद्या तुझ्या मुळाशी निर्माल्यात.."
भगवी कोमल अबोली...."अ"बोली तरी बोलते..!!!
मला म्हणते एक एक कशाला खुडतोस ? एकदम झुबका उचल ना बोटांनी...अलगद येऊ आम्ही निसटून.."
सदाफुली सुचवत असते..."ऊन असो, पाऊस असो, ढग की सुसाट वारं... माझ्या इवल्या दोन कळ्यांना मी ते जाणवूच देत नाही..लपतात लबाड माझ्यामागे... "
रातराणी फुलते ती रात्री...म्हणते...."स्वच्छ कोजागिरीचं आकाश...जितक्या तारका तिथे तितकी माझी फुले इथे...तारका अंतराळात लुकलुकतात...माझी फुले इथे आसमंतात परिमल दरवळून सोडतात...
एकदा मी 'कातर'-जास्वंदीला विचारलं....तुझ्या ह्या तेजस्वी लाल नाजूक पाकळ्या शाळेत हस्तकलेत शिकवतात तशा कुणी सुरेख कातरल्या ? उत्तरादाखल तो लांब बाहेर आलेला तुरा जरासा डुलला ...
माझ्या कन्येने पुष्पौषधींचा अभ्यास केला तेव्हा एक सुंदर विचार तिनं सांगितला... "flower intuition " फुलांच्या सान्निध्यात जपलेलं अंतर्ज्ञान आणि तात्कालिक ज्ञान...
मी करणार आहे तसा intuition आणण्याचा प्रयत्न.
मधुसूदन थत्ते
२९-०९-२०२०
**************************************
टपोरा आनंद...
**************
सकाळी बागेत जाणं नित्याचंच...आज म्हंटलं संध्याकाळी बाग निरखावी.....
पिवळं जर्द गुलबक्षीचं फूल...झाड जणू मोहोरलेलं....अन एक झाड नाही तर बागभर पिवळा पसारा..
संधीप्रकाशात सोनचाफा बोलावतोय...झाड उंच..सहसा हाती फूल येणार नाही...पण माझ्या कॉलोनीतलं उंच झाड काही पिवळी रत्ने ठेवतात हाती यावी अशी...!!!
पलीकडे शुभ्र टप्पोरं तगर....झाडीभर खोवलेलं खोबरं जणू भुरभुरलेलं...
पारिजाताला मान वर करून विचारलं..."तू का रे बाबा असा ओशाळलेला..?"
म्हणाला...
“जरा पायाखाली बघ...”
पाहतो तो जमीनभर दिवसभरात अशक्त झालेली प्राजक्त फुले....मलाच लाज वाटली...घेतला काढता पाय...उद्या सकाळी एक एक करत टप्पोरी पारिजात मी खाली भिरभिरत येत असतांना परडीत थेट उतरवून घेईन....त्यातही टप्पोरा आनंद सामावलेला असतो ना...!!!
मला अबोलीला, सदाफुलीला किंवा जपाकुसुम फुलांना कधी मी टप्पोरं असं म्हंटल्याचं आठवत नाही...त्यांनी दिलेला आनंद...well ..काय म्हणू त्याला...?
मागून कुणी म्हंटलं ...ती गुलबक्षी फ्रिज मध्ये ठेवा....हे ताजेपण उद्या पण असंच असेल....
माझ्या लक्षात आलं...रोज सकाळी मला सारी पिवळी गुलबक्षी कोमेजून मान टाकलेल्या स्थितीत नित्य दिसते...
लगोलग मी एका ताटलीत खुडलेली गुलबक्षी ठेवली ...फ्रिजसाठी...!!!
आणि मला एक भास झाला....
एक छोटी बाला दुडू दुडू धावत येत्ये आणि गुलबाक्षीच्या ताटलीकडे पाहून म्हणत्ये....ह्यांचे देठ एकात एक अडकवून मला हार करून द्याल का...?
ही पद्मजा तर बाल्य लेऊन आली नव्हती...?
मधुसूदन थत्ते
०८-०९-२०२०