माझा पारिजात ...
***************
मागल्या वर्षी वर्षा ऋतू आला आणि पारिजात खुलला-फुलला-भरभरला...ते अगदी हेमंताच्या मध्यापर्यंत....
दारी सड्याची रांगोळी रोज सकाळी पाहावी...झाडाने नम्रपणे सुचवायचं "इथे जरा जपून या..."
मग मी फुले गोळा करत करत वाट मोकळी करत पुढे पाऊल टाकत जायचा... गोळा करतांना वा-याच्या झोतात माथ्यावर पुष्पवृष्टी व्हायची. मनात यायचं माझ्या झाडाला कुठे माहीत मी कसा आहे....पण आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते असं देत राहावं हेच सुचवायचा ह्या वृक्षाला...
हेमंत ऋतू पावलापावलांनी पुढे येत राहिला आणि माझा प्राजक्त दिनप्रतिदिन सांगत गेला..."देवपूजेला देईन थोडी फुलं पण फुलांनी घट्ट धरून ठेवलंय जागोजागी...तुला ती खुडावी लागतील..."
कुठे श्रावणातला भुईभर सडा अन कुठे हे माघातलं वास्तव.....कधीही न मोजता यावी अशी ह्याची फुले आता अगदीच अल्पसंख्य झाली...वारा सुटला तरी फुलं काही सुटत नाहीत पानापासून अलग...
पण...
सृष्टीचा हा नियम आहे....ऋतुचक्राची ही जादू आहे....
भारद्वाराज आला...चंडोल आला....म्हणाले बघ आता वसंत येईल...कोकीळ येईल....पोपट येतील..
पण हा वृक्ष खरा फुलेल तो ग्रीष्मानंतर...
पहिल्या मेघश्यामाला पाहून....कुठे कानी आली तर मोराची केका ऐकून त्या मयुराप्रमाणे हा थरथरेल आणि बघशील भिरभरत फुले खाली येतील...सडा आणि मृदगंध पाहून वारा सुटेल आणि सर्वदूर परिमल पसरला जाईल...
भारद्वाराज आणि चंडोल दोघांनी ४ महिने थांबायला सांगितलंय...
वाट पाहीन...
मला माझा पारिजात खूप खूप फुललेला हवा आहे...
मधुसूदन थत्ते
१०-०३-२०२१
*******************************************************
आजची प्रसन्न संध्याकाळ
तसं आभाळ भरून आलं होतं दुपारपासून...बाहेर अंगणात खुर्ची टाकून आभाळाकडे नजर लावून बसलो होतो....
परिसर दुधी झालेला मला आवडला...झाडांनाही नक्की आवडला असावा...पुष्पहीन पारिजात खूप हलला ...पडली फक्त शुष्क पानं..
आलाच..एक थेंब आलाच माझ्या डोक्यावर...
मी म्हंटल...येरे येरे पावसा, ये ना रे पावसा...
ऐकलं त्याने माझं..मला खुर्ची घेऊन आत जायला लावलं त्याने...
आणि मग...
असा काही भरकटत धरतीला भेटाया आला की काही विचारू नका...
सर्वदूर मातीचा सुगंध बहुतेक त्याला उधळायचा होता...
एक खेळी खेळून गेला..
आता माझी खेळी...
पटापट १-२ फोटो काढले...ऐन पावसात...कॅमेरा भिजला जरासा..
so what ? फक्त तो मृदगंध मात्र आला नाही फोटोत,,,,
again ...so what ?
मधुसूदन थत्ते
२१-०३-२०२१
फोटो मीच काढला आहे
*******************************************
फुलांचे बोल...
************
"चाफा बोलेना".........खूप काळामागे कवी बी (नारायण गुप्ते) ह्यांनी एक सुंदर गाणे रचले...पुढे ते लतादीदींच्य सुंदर स्वरात आल्यावर आपल्या सर्वांच्या तोंडी कायम बसले...
का बरं चाफा बोलेना..?
कवीच्या मनात खूप काही असेल पण फुलांचे बोल ही कल्पनाच मला खूप जवळची वाटली...
माझ्या बागेतली फुलं रोज माझ्याशी बोलतात...एकतर्फी असतं ते बोलणं...
पारिजात जेव्हा वर फांदीवर असतं आणि हळूच निसटून परडीत येतं ते फांदीला म्हणतच..."निघते रे..जाईन देवाच्या पायाशी अन येईन उद्या तुझ्या मुळाशी निर्माल्यात.."
भगवी कोमल अबोली...."अ"बोली तरी बोलते..!!!
मला म्हणते एक एक कशाला खुडतोस ? एकदम झुबका उचल ना बोटांनी...अलगद येऊ आम्ही निसटून.."
सदाफुली सुचवत असते..."ऊन असो, पाऊस असो, ढग की सुसाट वारं... माझ्या इवल्या दोन कळ्यांना मी ते जाणवूच देत नाही..लपतात लबाड माझ्यामागे... "
रातराणी फुलते ती रात्री...म्हणते...."स्वच्छ कोजागिरीचं आकाश...जितक्या तारका तिथे तितकी माझी फुले इथे...तारका अंतराळात लुकलुकतात...माझी फुले इथे आसमंतात परिमल दरवळून सोडतात...
एकदा मी 'कातर'-जास्वंदीला विचारलं....तुझ्या ह्या तेजस्वी लाल नाजूक पाकळ्या शाळेत हस्तकलेत शिकवतात तशा कुणी सुरेख कातरल्या ? उत्तरादाखल तो लांब बाहेर आलेला तुरा जरासा डुलला ...
माझ्या कन्येने पुष्पौषधींचा अभ्यास केला तेव्हा एक सुंदर विचार तिनं सांगितला... "flower intuition " फुलांच्या सान्निध्यात जपलेलं अंतर्ज्ञान आणि तात्कालिक ज्ञान...
मी करणार आहे तसा intuition आणण्याचा प्रयत्न.
मधुसूदन थत्ते
२९-०९-२०२०
**************************************
टपोरा आनंद...
**************
सकाळी बागेत जाणं नित्याचंच...आज म्हंटलं संध्याकाळी बाग निरखावी.....
पिवळं जर्द गुलबक्षीचं फूल...झाड जणू मोहोरलेलं....अन एक झाड नाही तर बागभर पिवळा पसारा..
संधीप्रकाशात सोनचाफा बोलावतोय...झाड उंच..सहसा हाती फूल येणार नाही...पण माझ्या कॉलोनीतलं उंच झाड काही पिवळी रत्ने ठेवतात हाती यावी अशी...!!!
पलीकडे शुभ्र टप्पोरं तगर....झाडीभर खोवलेलं खोबरं जणू भुरभुरलेलं...
पारिजाताला मान वर करून विचारलं..."तू का रे बाबा असा ओशाळलेला..?"
म्हणाला...
“जरा पायाखाली बघ...”
पाहतो तो जमीनभर दिवसभरात अशक्त झालेली प्राजक्त फुले....मलाच लाज वाटली...घेतला काढता पाय...उद्या सकाळी एक एक करत टप्पोरी पारिजात मी खाली भिरभिरत येत असतांना परडीत थेट उतरवून घेईन....त्यातही टप्पोरा आनंद सामावलेला असतो ना...!!!
मला अबोलीला, सदाफुलीला किंवा जपाकुसुम फुलांना कधी मी टप्पोरं असं म्हंटल्याचं आठवत नाही...त्यांनी दिलेला आनंद...well ..काय म्हणू त्याला...?
मागून कुणी म्हंटलं ...ती गुलबक्षी फ्रिज मध्ये ठेवा....हे ताजेपण उद्या पण असंच असेल....
माझ्या लक्षात आलं...रोज सकाळी मला सारी पिवळी गुलबक्षी कोमेजून मान टाकलेल्या स्थितीत नित्य दिसते...
लगोलग मी एका ताटलीत खुडलेली गुलबक्षी ठेवली ...फ्रिजसाठी...!!!
आणि मला एक भास झाला....
एक छोटी बाला दुडू दुडू धावत येत्ये आणि गुलबाक्षीच्या ताटलीकडे पाहून म्हणत्ये....ह्यांचे देठ एकात एक अडकवून मला हार करून द्याल का...?
ही पद्मजा तर बाल्य लेऊन आली नव्हती...?
मधुसूदन थत्ते
०८-०९-२०२०
No comments:
Post a Comment