Tuesday, August 9, 2022

 

देवाच्या तरी दारी

ईगो ठेवी बाहेरी ...

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

मित्रांनो आजचा अनुभव...

सौ आणि मी नारद-मंदिर (सदाशिव पेठ, पुणे) परिसरात होतो. छत्री नव्हती..नेमका पाऊस आला...स्वामी समर्थांचा मठ तिथेच होता...गेलो दर्शनाला..

मठाबाहेर रस्त्यालगतच्या पायरीला लागून रस्त्यावर एक काथ्याचे पायपुसणे होते. आम्ही आमची पायतणे अनवधानाने त्याच्यावरच काढली..आत गेलो..दर्शन घेऊन बाहेर आलो..

इतक्यात..

"अहो...ते काथ्याचे पाय पुसणे जोडे ठेवायला नाही...!!!" एक चाळीशीचा सज्जन जरा करड्या स्वरातच म्हणाला...

"ओहो, आमच्या लक्षात नाही आलं हो...चूक झाली..क्षमा असावी..." मी

त्या सज्जनाचा चेहेरा जरा निवळला आणि आम्ही निघालो

..

इतक्यात, पुन:

" काका, तुम्हालाही आता तेच सांगायचे का? अहो त्या पायपुसण्यावर चपला ठेवायच्या नाहीत.."

तोच सज्जन दुस-या एका वृद्धाला सांगत होता...त्याच अधिकार वाणीने..

"कोण तुम्ही? मला सांगणारे..? मी गेली १५ वर्षे मंदिरात येतो आहे..मला शिकवू नका..." तो वृद्ध

"पुन: सांगतो, चपला तिथे ठेवायच्या नाहीत. ठेवल्यात तर मी पायाने देईन भिरकावून..." सज्जन...

आम्ही पुढे काय झाले हे पहायला थांबलो नाही...स्वामी कृपेने पाऊस थांबला होता...

पण मनोमन म्हटले...

"स्वामी उरला सुरला ईगो निपटून काढायला मला मदत करा..." !!!!

 

मधुसूदन थत्ते

०९-०८-२०२२



No comments: