Sunday, December 17, 2023

 

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा....

हो, नोव्हेंबर १९६५च्या आधी (माझं ह्या मध्यप्रदेशातल्या गावाशी नातं जुळलं ते वर्ष) असं स्वप्नवत गांव माझ्या ओळखीचं, जिवाभावाचं होईल हे कसं मानावं मी?

आज उपनगर असलेलं हे गांव १९६५ साली खेडेवजा होतं...

मुंबई-पुण्याचे आम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकी इथली निसर्ग समृद्धी-संपत्ती...

खेडं नगर झालं पण धरणीमाता...काळी आई...ऋतू दर ऋतू श्रीमंतच होतं गेली. इथे शेताला बीड म्हणतात आणि मळ्याला म्हणतात बाडी.

ही जी पायवाट फोटोत दिसते ती इथल्या विस्तृत अशा बाडीची आहे. ही जी वृक्ष-कतार दिसत्ये ती सागाची झाडे आहेत..अधून मधून आवळ्याचेही वृक्ष आहेत. आणि मुख्य भूभाग आहे सोन्याने भरलेला...सोने? हो जे इथे धनधान्य-समृद्धी रूपात डोलताना दिसेल.

मी अनेकदा ह्याच पाऊलवाटेवरून ह्या परिसराचा आनंद घेतला आहे...पश्चिम जेव्हा सूर्यास्तामुळे सुवर्णमय होऊ लागते तेव्हा इथून परततांना मन हळवं होतं...एकदा सर्वदूर नजर टाकून मी परत घराला जातो.

मधुसूदन थत्ते
१७-०५-२०२३

Saturday, December 16, 2023

 मित्रांनो दि. ११ ते १५ ऑगस्टच्या ५ भागानंतर हा वेद वाङ्ग्मयाच्या परिचयाचा पुढचा छोटासा भाग...

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
शंकराचार्यांचा जो दि. १५ च्या लेखनात खाली उल्लेख केला आहे त्यास अनुलक्षून श्री सुहास गुर्जर ह्यांनी सुचविले आहे ….
<<शंकराचार्यांच्या लिखाणातील काही उतारे येथेच टाकलेत तर फार चांगले होईल. त्यांचा सर्वांना थोडा अधिक परिचय होईल>>
त्या अनुषंगाने, प्रथम शंकराचार्यांनी वेद-गौरवपर काय लिहिले हे ह्या श्लोकात पहा:
श्लोक
निगमाचार्यवाक्येषु भक्ति: श्रद्धेषु विश्रुता |
चितैकाग्यं तु सल्लक्ष्ये समाधानमिति स्मृतम ||
पदच्छेद
निगमाचार्यवाक्येषु भक्ति: श्रद्धा इति विश्रुता |
चित्त ऐकाग्यं तु सत लक्ष्ये समाधानम इति स्मृतम ||
अर्थ:
वेदद्न्य श्रेष्ठांच्या किंवा गुरुंच्या शब्दांवर भक्ति, श्रद्धा ठेवणे आणि सत्यमय लक्ष्याकडे चित्त एकाग्र करणे म्हणजे समाधान होय.
निगम म्हणजे वेद. वेदांमध्ये चांगले काय, वाईट काय ह्याचा विचार आहे. त्या विचारांप्रमाणे आचरण करून ज्यांनी सत्यत्वाचा अनुभव घेतला आहे त्यांना आचार्य असे ह्या ठिकाणी म्हटले आहे.
ज्या श्रेष्ठांनी ब्रह्मसूत्रे, उपनिषदे आणि भगवद गीता ह्या तीन ग्रंथावर विचारपूर्वक भाष्ये लिहिली आहेत त्यांना आचार्य अशी संज्ञा आहे.
यामध्ये प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ, भावार्थ, गुप्तार्थ आणि त्या अर्थांचा वेद वचनाशी आणि पर्यायाने देव-सत्तेशी काय संबंध आहे याचा अनुभवसिद्ध विस्तार असतो. स्वाभाविकपणे अशा श्रेश्ठावर आणि त्याच्या शब्दावर संपूर्ण विश्वास ठेवणे.......
संदर्भ: श्रीमद आद्य श्री शंकराचार्यांच्या संकीर्ण रचना
लेखक: स. कृ. देवधर आणि प्रा. मेघ:श्याम सावकार.
पृष्ठ: २४-२५.
मधुसूदन थत्ते
१७-०८-२०१४
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
मित्रांनो दि. ११ ते १४ ऑगस्टच्या ४ भागानंतर हा वेद वाङ्ग्मयाच्या परिचयाचा पुढचा छोटासा भाग...
१५ -०८-२०१४
आद्य शंकराचार्य......कलियुगातले सर्व श्रेष्ठ युगपुरुष....असे जे म्हटले जाते त्या अनुषंगाने...
त्यांचे असेही वर्णन केले जाते...
"वैदिक वांग्मयरूपी विशाल महासागरात सहज लीलेने सर्वत्र संचार करणारा महामत्स्य...."
आचार्यांनी एकाहून अधिक वेळा भारत भ्रमण केले, वैदिक धर्माची विसकटलेली घडी नीट बसवली..आणि स्वत:ची अशी महान, विस्तृत ग्रंथ-संपदा निर्माण केली आणि हे अत्यल्प अशा त्यांच्या आयुष्यात केले...!!!
ज्या वयात शंकराचार्यांनी देह ठेवला त्या वयात आजचे पुरुष आपापल्या कर्तृत्वाची सुरुवात करतात....!!!
त्यांच्या ग्रंथांमधून अनेक वचने आधार म्हणून घेतली गेली...घेतली जात आहेत आणि घेतली जातील...
त्यांनी ज्या वैदिक वांग्मयरूपी विशाल महासागररूपी ताकातून जणू हे नवनीत (लोणी) काढले त्या ग्रंथांची नावे तर पहा जरा...
ईश, केन, काठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, नारायण, श्वेताश्वतर. कौषीतकी, जाबाल, कैवल्य, ब्रह्मबिन्दु, नृसिंहतापिनी, अग्निरहस्य ही उपनिषदे...
आणि..
ऋकसंहिता, तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण तैत्तिरीयारण्यक, शतपथ ब्राह्मण, छांदोग्य ब्राह्मण, षडविंश ब्राह्मण, तांड्य ब्राह्मण, गीता, ब्रह्मसूत्र, वैशेषिक सूत्र, महाभारत, माणूस्मृती इत्यादी...
मला ह्यातली कित्येक नावे माहित नव्हती...
माझ्या पूर्ण engineering शिक्षणात ह्या संख्येने मी पुस्तकांचे अध्ययन नक्कीच केले नव्हते....!!!
काय म्हणावे ह्याला? दैवी चमत्कार? त्यांच्या आधीच्या जन्मांचे पूर्व संचित? (मग पुनर्जन्मावर विश्वास हवा) आठशे वर्षांपूर्वी होऊन गेलेले आपले ज्ञानोबा त्याच श्रेष्ठत्वाचे...!!! तेच का आधीचे आद्य शंकराचार्य?
कुणी सांगावे?
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
१४ -०८-२०१४
मित्रांनो दि. ११, १२ आणि १३ ऑगस्टच्या भागानंतर हा वेद वाङ्ग्मयाच्या परिचयाचा पुढचा छोटासा भाग...
---------------------------
१४ -०८-२०१४
आपण पुराणे, वेद आणि उपनिषदे ही नांवे ओझरती इथवर पाहिली...उपनिषद हे वेदाचे सार मानले आहे..तत्वत: असे त्यात थोडक्यात विवेचन आहे.
आपल्या धर्म ग्रंथात दोन प्रमुख उद्दिष्टे दिसून येतात...एकात असते उच्चार प्राधान्य आणि दुस-यात असते विचार प्राधान्य.
उच्चार आणि विचार....किती आकर्षक आणि सुयोग्य अशी ही मांडणी आहे...
संहिता (वेद) हे उच्चार प्राधान्य.सांभाळतात आणि उपनिषदे सांभाळतात विचार प्राधान्य.
मी तर ह्या दृष्टीने विचार केलाच नव्हता.
वेद मंत्रांच्या जपाने काही विशिष्ठ दृष्ट आणि अदृष्ट फळे प्राप्त होत असतात. ह्यामुळे ह्या मंत्रांच्या उच्चारांना फार महत्व असते. हे उच्चार बिनचूक करायला हवेत. ते तसे व्हावे म्हणून वेद अध्ययनाच्या पाय-या सुद्धा निश्चित केल्या गेल्या..पद, क्रम, जटा यापासून ते घनांत अध्यापनाची मांडणी केलेली दिसते...
आपण घनांतपाठी असे वेदाचार्यांना जेव्हा संबोधतो तेव्हा "घनांत" शब्दामागे काय परिश्रम असतात ह्याची सहसा कल्पना नसते...ती तर असते शेवटची पायरी...ह्या आधी काय प्रचंड कष्ट आणि प्रयत्न असतात ह्याची कल्पना करावी...
असे घनांत अध्ययन झाल्यावर जिव्हाग्रावर वेद मूर्तिमंत नांदत असतात आणि म्हणून अशांना "वेदमूर्ती" म्हणायचे..!!!
पुढल्या लेखात आणखी काही...
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
१३ -०८-२०१४
मित्रांनो दि. ११ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट च्या भागानंतर हा वेद वाङ्ग्मयाच्या परिचयाचा पुढचा छोटासा भाग...
एक चतुर विद्वान होऊन गेला. त्याने पाहिलं ..पुराण आहेत 18 ...एवढी नावे कशी लक्षात ठेवावी?..मग त्याने केला एक श्लोक...
'म' द्वयं, भ द्वयं चैव, 'ब्र' त्रयं, 'व' चतुष्टयम |
अनापलिंगकूस्कानि पुराणानि प्रचक्षते ||
ह्या श्लोकात प्रत्येक पुराणाचे आद्याक्षर घेऊन अठरा पुराणे कोणती ते हा श्लोक पाठ केलेला असला तर लहान मुलांनाही सांगता येईल अशी योजना केली आहे. कसे ते पहा:
'म' द्वयं म्हणजे १) मत्स्य व २) मार्कंडेय
भ द्वयं म्हणजे १) भविष्य व २) भागवत (देवी)
'ब्र' त्रयं म्हणजे १) ब्रह्मवैवर्त २) ब्रह्मांड ३) ब्रह्म
'व' चतुष्टयम म्हणजे १) वराह २) वामन ३) वायू ४) विष्णु
आणि..
अ-ना-प-लिं-ग-कू-स्कानि म्हणजे ही सात...
अग्नी; नारद; पद्म; लिंग; गरुड; कूर्म; स्कंद
अशी झाली १८ पुराणे...
वेद आणि पुराणे ह्या साहित्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे...त्यावर अपार श्रद्धा आहे हे मी ग्राह्य धरले आहे...
ह्याची निर्मिती नेमकी केव्हा झाली? कोणी केली असे प्रश्न काहींना गौण वाटतील पण उत्सुकता तर असतेच...
आपण चार युग मानली आहेत..त्या त्या युगात ज्यांच्याकडून समाजाला अधिकाधिक मार्गदर्शन झाले ते असे मानले गेले आहेत:…………
अति प्राचीन काळी म्हणजे कृत युगात भगवान वैवस्वत-मनु..ह्या युगाला तप काल म्हटले गेले.
त्यानंतरच्या त्रेतायुगात वेदाचार्य अपांतरतमा..ह्या युगाला ज्ञान काल मानले गेले
नंतर द्वापार (यज्ञ काल) आणि कलियुग (दान काल) ह्यांच्या संधिकालात द्वैपायन व्यास आणि योगीश्वर याद्न्यवल्क्य
आणि सध्या चालू असलेल्या काळात आद्य श्री शंकराचार्य
असे सर्व श्रेष्ठ सत्पुरुष होऊन गेले.
आज भारतात जो श्रुती-स्मृती-पुराणोक्त धर्म चालू आहे त्याला श्रीमद्वैपायन व्यासांनीच चालना दिलेली आहे.
पुढल्या लेखात आणखी काही...
मधुसूदन थत्ते
१३ -०८-२०१४
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
१२-०८-२०१४
वैदिक संस्कृतीतील क्षण, पळ, घटका, अहोरात्र..पक्ष, मास, ऋतू, अयन, संवत्सर, संवत्सरचक्र, युग, मन्वंतर आणि कल्प अशी अनादी आणि अनंत कालगणती पुराण ग्रंथात दिलेली असते.
सध्याचे मन्वंतर "वैवस्वत" नावाचे आहे आणि कल्प आहे "श्वेतवाराह"
मन्वंतराचे आणि कल्पांचे साधारण विस्तृत वर्णन प्रत्येक पुराणात असते. याचप्रमाणे प्रत्येक पुराणात प्राचीन दंतकथा, आख्यायिका, श्रेष्ठ क्षत्रिय राजांच्या वंशावळी व त्यांचे इतिहास ह्याचा समावेश असतो. ते ते पुराण ज्या देवतेला उद्देशून असते तिच्या अवतारकार्याचे वर्णनही त्या पुराणात असते.
भगवान वेदव्यास जसे द्वापार आणि कलियुगाच्या संधीकालात महाभारतकर्ते म्हणून आपल्याला माहित आहेत तेच आपल्या आधीच्या युगावतारात "अपांतरतमा" नांवाने असेच महान कार्य करते झाले असा निष्कर्ष उपलब्ध अशा आद्य श्री शंकराचार्यांच्या रचनांमध्ये दिलेला आहे.
ह्या अपांतरतमा ऋषींनी विष्णू, शंकर, देवी, अशा भिन्न भिन्न देवतांना उद्देशून अठरा पुराणे लिहिली आहेत. त्या त्या पुराणात त्या त्या देवतांनी साधूंचे परित्राण, दुष्टांचा विनाश, वैदिक धर्माची स्थापना हे सारे कसे कसे केले ह्याचा उल्लेख असतो.
म्हणजे प्रत्येक पुराणात लघुप्रलय, महाप्रलय. मन्वंतरे, कल्प, वेद, वेदप्रवर्तक ऋषी, प्राचीन आख्यायिका, दंतकथा, क्षत्रिय राजांच्या वंशावळी, त्यांचे इतिहास इत्यादी माहिती थोडक्यात असते.
पुढल्या लेखात आणखी काही...
मधुसूदन थत्ते
१२-०८-२०१४
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
११-०८-२०१४
मित्रांनो,
काही गोष्टी आपण गृहीत धरतो..काही अन्य आपल्याला माहीतच नसतात...आणि जेव्हा माहित होतात तेव्हा वेगळा आनंद होतो..
आता हेच पहा ना...
सृष्टीत प्रलय होतो...युग नवे जन्माला येते हे साधारण माहित असते...पण..
अशी छोटी मोठी प्रलये येत रहातात त्या एका प्रलया पासून दुस-या प्रलयापर्यंतच्या काळाला मन्वंतर म्हणतात.
अशी कित्येक मन्वंतरे मिळून एक कल्प होतो...
कल्पातील शेवटच्या मन्वंतरानंतर महाप्रलय होऊन त्या कल्पाचा अंत होतो..त्यालाच कल्पांत म्हणतात....तेव्हा सृष्टीत कोणीच शिल्लक रहात नाहीत...आणि "मायेच्या" अस्तित्वाने "बहुस्यां" असा संकल्प स्फुरतो आणि सृष्टी अव्यक्तातून पुन: व्यक्त रूप घेते. (गीता: श्लोक ८.१८-१९)
आता यापुढे..पुराणात काय काय असते..किती पुराणे आहेत...पंचम वेद म्हणजे काय हे हळू हळू पाहू...
ही वर दिलेली माहिती एका महान ग्रंथकाराने त्यांच्या मोठ्या ग्रंथात लिहिली ज्याला १९७३ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन २००७ साली त्यांच्या नात-जावयाने (म्हणजे विद्या वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर) केले आहे. (सोबतचा फोटो पहा).................
मधुसूदन थत्ते
११-०८-२०१४



 

परवा एक उथळ पाणी खूप खळखळलं...

जेमतेम विशिला पोचलेला एक सुपुत्र उद्गारला..."मला भगवद-गीता पटत नाही..."

"का रे.. आणि तू एवढे ठोसपणे सांगतो आहेस...वाचली आहेस का तू गीता"...मी

ह्यावर त्याने सरळ उत्तर दिले नाही...म्हणाला..."काय तर म्हणे फळाची आशा धरू नका....जे कराल ते सगळे 'मलाच' अर्पण करा, 'मलाच' द्या...कसे हे पटेल सांगा मला..."

पाणी खूपच उथळ होते...खूपच खळखळाट होत होता...

मनात आले...ह्या डबक्याला कुणीच खोली दिली नाही का? त्यात जास्तीचे पाणी कुणी भरले नाहीच का? असे का हा बोलतोय?

मग त्याहूनही जास्त खेदजनक विचार मनात आला...आणि त्याला विचारले...

"काय रे हा प्रश्न तुझ्या मनात कसा आला?"

"अहो आमचा ग्रुप परवा discuss करत होता तेव्हा सा-यांचे मत हेच होते..."...तो..

माझी शंका खरी ठरली...

हा मुलगा फक्त आजच्या ह्या मानसिकतेचा प्रतिनिधी होता...शेवटी भगवद-गीता चव्हाठ्यावर पोरा-सोरांनी 'discuss ' करण्याचा विषय बनलेली आहे आज...

जेव्हा त्याला मी थोडी माहिती नंतर निवांतपणे भेटल्यावर दिली तेव्हा आपण होऊन मला म्हणाला...

"काका, मला खूप डबक्यासारखे वाटू लागले आहे हो..."

 

मधुसूदन थत्ते

१७-१२-२०२३