Friday, March 23, 2012
अश्रूंची जातकुळी
अळी मिळी गुप चिळी पहिला बोलेल तो....
मी ६-७ वर्षाचा असेन, मोठी बहिण असेल २ वर्षांनी मोठी. धाक फार तिचा...आज दोघे सत्तर पार ...परवा तिला ह्याची आठवण करून दिली...दोघे मग बराच काळ " गुप चिळी " च्या रम्य राज्यात होतो...
हळूच डोळ्यात अश्रू चमकला. तिने तो पाहिला...म्हणते..."ह्या अश्रूची जात कुळी कोणची रे"....
दूर बनारसला कॉलेज प्रवेश मिळाला. बहिण आणि आई-बाबा होस्टेल मध्ये मला एकट्याला सोडून मुंबईला निघाले, रिक्षात मागे वळून वळून ती पहात होती...साश्रू नयनांनी... मी मनी तिला विचारले ""ह्या अश्रूची जात कुळी कोणची ग?" पण ती सासरी जाताना साश्रू नयनांनी निघाली तेंव्हा समजले ते रिक्षातले आणि हे इथले...एकच जात कुळी की..!!!
मला पदवी मिळाली, विशेष प्राविण्य मिळाले...घरी आधीच कळले होते..आलो तर देवघरात आई..देवाला मनोभावे कांही सांगत असावी. बाहेर आली. माझा नमस्कार घेत म्हणाली "असेच यश मिळव" तिच्या डोळ्यातला अश्रू तिने का लपवला? ती तर वात्सल्याची जात कुळी.
बाबा गेले. त्याना उचलताना फार आक्रोश झाला. देवा ह्या जात कुळीचे अश्रू कोणाच्या वाट्याला आणू नकोस असे अशक्य साकडे मी देवाला घातले.
प्रेमळ पत्नी लाभली. माझ्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू यावे असे घडले कांही वेळा पण नंतर माझी उशी आसवांनी भिजलेली पाहून जी आसवे तिने गाळली...त्या जात कुळीचा अंदाज तरी येईल का तुम्हाला....???
सांगा पाहू या सर्वातील कुठली जात कुळी अधिक मोलाची?
हा प्रश्नच निरर्थक नाही का?
मधुसूदन थत्ते
चकवा
"अनंता, ऐक माझे अंधार तुडवत जावे लागेल पुढे. माघारी फिर" सीमेवरल्या पडक्या राउळातून आवाज आला.
चमकून अनंताने त्या दिशेने पाहिले, गुरव होता त्याला सांगणारा.
"बाप्पाजी, मला जायलाच हव. अन अंधाराची काय मला सवय नाही?" ..अनंता
"जा बापड्या, पर दिवटी ने हाताशी.."..गुरव
अनंता मनाशी म्हणाला, ह्याला काय सांगणार? पहाटेचं स्वप्न खरे होते, मला जायला हवे, ह्याला कुठे सांगत बसू सारे?
अनंताने फक्त कानीला अर्धे स्वप्न सांगितले होते.
"बायको आहे, उगीच काही घडले तर तिला माहित हवे कुठे मी गेलो ते." आणि खरी गोम तर त्या न सांगितलेल्या अर्ध्या भागात होती..!!!
झप झप पावले पडत होती. पायाखालची वाट होती.. पण ती दिवसा...आज अमावस्येची काळोखी रात्र..ही वाट चकव्याची तर खरीच..पण हे सारे स्वप्नात गृहीत धरले होते.
एक चकवाच तर मला नेणार आहे त्या जागी....स्वप्नात कोंडाजी तसे म्हणाला होता...
कोंडाजी...अनंताच्या बालपणीच वारला होता पण त्याची ती विचित्र बासरी अनंता कधीच विसरला नव्हता. कोंडाजी तसा वेडा होता पण कधी कधी असे बोलायचा की लोक चक्राऊन जायचे. त्याच्या बासरीतून सुद्धा काही वेळा ज्या ध्वनी लहरी यायच्या त्या आपल्या कान-कक्षेच्या बाहेरच्या असाव्यात. लहानपणी असे काही त्याने वाजवले की राउळा शेजारच्या त्या भल्या मोठ्या पिंपळावरची घुबडे अस्वस्थ होऊन उडायची.
कोंडाजी गेला पण ह्या काही आठवणी कायम ठेऊन गेला आणि किती वेळा तो अनंताच्या स्वप्नात यायचा !!! आज पहाटे मात्र त्याने कहर केला. अनंताला चक्क धमकी दिली...तू हे करून जर मला सोडवले नाहीस तर तुला माझ्या जागी आणून मी मुक्ती मिळवायचा विचार करेन.
...हे काय वेड्याचे बोल? का आम्ही त्याला वेडा ठरवला त्याच्या जिवंतपणी ?
त्या अंधार गुडूप भयाण मार्गावर त्याला त्याच्याच पाउलाचा आवाज घाबरवत होता...प्रतिध्वनी होऊन..
अनंता तसा भित्रा अजिबात नव्हता. राउळामागील पडक्या भिंतीमागे भूत रहाते असे गावकरी म्हणत तेव्हा एक दिवस त्याने गावक-याशी पण लावला...
"अमावास्येच्या रात्री बारा वाजता तिथे जाऊन अर्धा तास बसून ये...आम्ही राउळातून नजर ठेऊ...हरलास तर गाव सोड जिंकलास तर गावाचा तू दुसरा पाटील मानू"
अनंता त्यामुळेच तर गोविंद पाटलानंतर गावाचा पाटील होणार होता.
पण आज हे सारे वेगळे आणि विचित्र होते.
"चकवा....चकवा...अरे नेहेमी लोक तुला घाबरतात आज मी तुला हाका मारतोय ये, दाखव मला मार्ग घुबडाच्या ढोलीचा ....होय, कोंडाजीची शपथ तुला...." हे अनंताने म्हटले इतक्यात उजवीकडच्या झाडीत काही चमकले..."काय...? अरे हे तर काजवे..चकव्याची दिवटी हव्ये मला"...
अंदाजाने त्याच्या लक्षात आले की झरणा नदीचा प्रवाह फार लांब नाही आता...
"नदीच्या आसपास चकवे हिंडतात ...माझा चकवा इथेच असेल जवळपास"...
इतक्यात त्याला कोंडाजीची ती विचित्र बासरी वाजतेय असा भास झाला, घुबडाचा आवाज...? हो तो ही भास झाला....नव्हे हा भास नव्हे...आणि इतक्यात...
प्रकाशाचा कल्लोळ होऊन चकवा उमटला अंधारात...
अनंता जणू चकव्याचे बोट धरून निघाला..काटे कुटे, दगड, धोंडे तुडवत, रक्त बंबाळ होत अनंता निघाला...किती चालला, कसा चालला, कुठे चालला कोण सांगणार?
इकडे, राउळात कानी काही माणसाना घेऊन आली होती.
"मी त्याला संगितले जाऊ नकोस...पण गेला..काही बोलला नाही".. गुरव
"अहो, कसलं बघा सपान होते म्हने, म्हनालं हाती हंडा घेऊन यीन, कोनाला सांगू नगस "
सर्वदूर कुजबूज सुरु झाली, म्हणता म्हणता शंभर माणसे गोळा झाली.
इतक्यात एक अति ओंगळवाणी कर्कश किंकाळी अनंता गेला त्या दिशेने आली.
काठ्या, कुऱ्हाडी सरसाऊन गावकरी धावले, बत्त्या आल्या थोडे आतपर्यंत गेले.
कुठे काय....चिटपाखरू देखील नव्हते. तासभर थांबून गावकरी परतले.
कानी बिचारी आली माघारी पण मन तिथेच ठेऊन आली, राउळातच जरा निजली.
अगदी भल्या पहाटे कानी उठली, तरा तरा निघाली अनंताच्या दिशेने...चालली चालली खूप चालली सूर्य आता वर आला होता झरणेचा किनारा आला.
झपाटल्यागत कानी आता धावू लागली पण पायाला काही लागून धडपडली..वर तोंड करून पहाते तो काय अनंता तिथे पडलेला, अनंतात विलीन होऊन. त्याच्या हातात एक बासरी...आणि...आणि..
त्याच्या डोक्यापाशी होता एक हंडा...मोहोरांचा...
मधुसूदन थत्ते
२७-०२-२०१२
टाण कटाण ढिस…….
टाण कटाण ढिस…….
टाण कटाण ढिस... टाण कटाण ढिस...टाण कटाण ढिस... टाण कटाण ढिस..
ढोल, झांजांच्या गजरात सगुणा त्या घोळक्याच्या पुढे हातवारे करीत तालावर नाचत, अर्धोन्मीलित नजर करून चालल्ये पुढे.
बेधुंदपणे चक्राकार आधी पुढे आणि मग मागे असे तिचे भुज फिरतायत..घोळक्याच्या मनी अपेक्षा, संभ्रम आणि भीती असा मिश्र भाव आहे. जिथे सगुणा थांबेल तिथे तिच्या मुखातून देवी बोलेल...आणि ते खरेच ठरेल...
महिन्यातून एकदा सगुणाचा हा सोहोळा व्हायचा सायखेड्यात.
एका दुपारी राधा आली तिच्याकडे...:
"सगुणे, माझे काही खरे नाही बघ..दलपती हल्ली फार त्रास देतो, म्हणतो तुझा तो शाळिग्राम उचलून फेकून देईन...दोन वर्षे झाली काही नशीब लागले नाही"
दलपती...एक गावातला कुडबुड्या जव्हेरी...रोज दूरच्या डोंगराकडे जातो...खणायला...तिथे गुप्त धन आहे असे त्याला माहित होते म्हणे...
राधेच्या बापाने राधेला हा भला मोठा शाळिग्राम देताना सांगितले होते, हिची रोज पूजा कर, खूप धन लाभ होणार आहे तुम्हाला.
दलपतीची हीच तर तक्रार होती...काही धन नाही आणि लाभ नाही...
"सगुणे, ही अंगठी पण बाबांनी दिली होती त्या पिंडी बरोबर. दलपतीला ती माहित नाही. ती पण तुझ्याकडे ठेऊ का?"
अंगठी ठेऊन राधा गेली. त्यानंतर दोन दिवसात राधा पुन: सगुणाकडे आली आणि "माझा महादेव, त्याने बघ कुठे फेकून दिला" म्हणून खूप रडली.
पुढच्या दोनच दिवसांनी रडण्याची पाळी दलपतीवर आली "अहो कुणी राधेला पाहिले का...सोडून गेली हो मला, कुठे गेली….. माहित नाही..."
झाले, पोलीस पाटील चौकशा सुरु झाल्या.
-----------------------------------------------------------------------------
पंधरा वर्षे लोटली त्यानंतर. काय काय घडले ह्या काळात? खूप... अगदी खूप.
मरीन लाईन्सच्या आपल्या प्रशस्त घरात भानुप्रसाद सकाळी सकाळी जरा सचिंत मुद्रेने विचार करत बसले होते. त्याना नुकताच फोन आला होता, त्यांच्या जड जवाही-याच्या दुकानात किरकोळ चोरी झाली होती काल, त्यासंबंधी होता फोन. त्याना काळजी ह्या चोरीची नव्हती तर ह्यात काही सूचकता असावी हे त्याना जाचत होते. इन्स्पेक्टर मदन त्यांच्या चांगले परिचयाचे होते. त्यांनी त्याना फोन लावला.
"भानुजी बोला, काय मदत हवी?"...मदन बोलले.
"मदन, कालची चोरी तुमच्या कडे सुपूर्त केली आहे पण मला वाटते हे भुरटे काम नाही. ह्यात खोल डाव असावा. असे मला का वाटते कळत नाही पण तुम्ही हे प्रकरण स्वत: हातात घ्यावे असे मला वाटते."..भानू.
"अहो, दास्ताने जरी कनिष्ठ असला तरी हुशार आहे. तो शोध घेतो आहेच आणि माझेही लक्ष आहे. निश्चिंत रहा"….मदन.
दास्ताने तपास करीत होताच. इन्स्पेक्टर मदन त्याच्या खोलीत अचानक आले. कपाटात तीन छोट्या प्लास्टिक च्या पिशव्या त्याना दिसल्या. :
"जे खडे चोरीला गेले त्यांच्याच सारखे काही मी घेऊन आलो आहे" दास्ताने म्हणाला. त्याच्याच वरच्या कप्प्यात अशाच एका पिशवीत मदन ने आणखी एक गोष्ट ठेवली होती ती त्यांनी काढली आणि ह्या खड्याच्या जवळ धरली...खूपच फरक होता त्यात. कुठे हिरकणी आणि कुठे गारगोटी.
"साहेब, ही अंगठी तुम्ही ठेवली होती इथे? मी विचारणारच होतो. आणि मनाशी म्हणाला…
साहेब दोन दिवसापूर्वी कुठे होते कोण जाणे आणि आज ही अंगठी त्यांनी इथे कुठून आणली असावी?
दास्ताने, पंधरा वर्षांपूर्वीच्या एका घटने संबंधीचा एक अतिशय कच्चा दुवा मला मिळाला आणि मी त्या गावी..सायखेड्याला जाऊन आलो परवाच. तेव्हा एक बाई अचानक नाहीशी झाली होती. काहीच दिशा न मिळाल्याने ती केस धूळ खात पडली होती इतकी वर्षे.
चार दिवसापूर्वी मला फोन आला तिथल्या चौकीचा... "येऊन जा, काही धागे दोरे मिळालेत आणि एका स्त्रीचा सांगाडाही सापडला आहे" दास्ताने ऐकताच राहिला...
इन्स्पेक्टर मदन सायखेड्याला पोचले ते तडक सगुणेच्या घरी. गावकरी सांगत होते...दर महिन्याला एक दिवस हिच्या अंगात देवी येते आणि मग काहीना काही नवीन कळते, घडते..बारक्या गोष्टी असतात...आम्ही मौजेने घेतो पण ह्यावेळेचे सारेच भयंकर...सगुणा इतकी चवताळलेली क्वचितच असायची अंगात आल्यावर.
टाण कटाण ढिस... टाण कटाण ढिस...टाण कटाण ढिस... टाण कटाण ढिस..
ढोलकी, झांजांच्या गजरात सगुणा घोळक्याच्या पुढे हातवारे करीत तालावर नाचत, अर्धोन्मीलित नजर करून चालल्ये पुढे..
आणि ती चालली की त्या डोंगरापलिकडच्या खंडारात, जिथे कधी काळी दलप्या जव्हेरी रोज खणायचा धन मिळेल म्हणून. तिथे बराच वेळ घुमली आणि ओरडत किंचाळत एका पडक्या भिंतीपाशी गेली "खणा हिते... खणा हिते ..." आक्रोश केला तिने.
“अन, सायब...आमी खणतोय, खणतोय...आन बगा आली कुदळीच्या टोकास्नी लागून एक फासळी... “
आणि मग गावक-यांनी ही चांदीची एकच जोडवी त्या सांगाड्याच्या पायाच्या बोटाची काढून ठेवलेली मला दिली. तेव्हाच सगुणा पण घाबरतच माझ्यापाशी आली आणि तिने ही अंगठी दिली. म्हणाली.."मला वाटले राधा आज ना उद्या येईल पण आता काय...ही पण तुम्हीच घ्या."
मदन परतले
"दास्ताने त्या अशा चोरीच्या वस्तूची खरेदी-विक्री करणा-या अजितभाईला उद्या इथे बोलाव...मी निरोप दिलाय म्हणा."...मदन.
अजितभाई येऊन विशेष उपयोग झाला नाही. जाता जाता त्या अंगठीवर मात्र त्याची नजर स्थिरावली.
"साहेब..ह्या अंगाठीतले हे रत्न...फार मोलाचे आहे...ते इथे कसे?"
मदन काही बोलले नाहीत. अजितच्या नजरेत मात्र त्याना विशेष चमक दिसली.
ह्या घटनेनंतर दोन दिवसांनी अजितभाईचा घाब-या आवाजात दास्तानेला फोन आला.."अरे दास्ताने, तुझे साहेब मला कुठल्या लफड्यात अडकवणार आहेत...काय भानगड आहे?"
"अरे आत्ता सांगत नाही, साहेब जरा घाईत आहेत आणि मला घेऊन निघाले आहेत कुठेतरी...मग बोलू.."...दास्ताने.
मदन दास्तानेला सांगत होते आपण आता जिथे जातोय तिथल्या माणसाशी माझे बोलणे सुरु झाले की तू एकदम ओरडायाचेस..."अरे "******" तुला मी इतके दिवस कसे ओळखले नाही? इथे तू मुंबईत असून..."
बस.. मग मी तुला बाहेर जा असे सांगितले तर जा नाहीतर आतच थांब"
ठरल्याप्रमाणे दोघे "त्या" घरी पोहोचले...दास्ताने बघतच राहिला...इथे तो कधीच आला नव्हता. आत गेल्यावर त्यांचे छान स्वागत झाले. घर बड्या श्रीमंताचे होते...तो धनिक समोरच बसला आणि मदन बोलायला लागले...इतक्यात दास्ताने ओरडला.."अरे दलप्या तुला मी इतके दिवस कसे ओळखले नाही? इथे तू मुंबईत असून..."
क्षणात तो माणूस मदन ना म्हणाला "कोण हो हा इतका उद्धट.."
लगेच मदन ही रागावूनच म्हणाले "दास्ताने, तुला माहित आहे तू काय बोलतोयस ते? आजच मी रिपोर्ट करून तुला काढून टाकतो की नाही बघ"....
दास्ताने गेला बाहेर.
"माफ करा दास्तानेला कधी कधी झटके येतात...पण काहो त्याने 'दलप्या' म्हटल्यावर तुम्ही का दचकलात?
बरे ते जाऊ दे...पंधरा वर्षापूर्वी "दलपतराव" अशा सहीचे तुम्ही काही कागद पत्र केले होते का.."
"न,,न,,नाही हे काय आज चाललय मदन साहेब?"..
"नाही, सहज विचारले...बर, ही एक जोडवी बघून घ्या कधी अशी पाहिली होती का?...जरा लक्षात रहाण्यासारखा घाट आहे त्याचा"
कपाळावरचा घाम पुसत मालक जरा सावरून बसले "नाही हो मी असे आधी काहीच पाहिले नाही"...
इतक्यात दास्ताने आणि एक पोलीस आत आले...दास्तानेच्या हातात त्या जोडव्यातली दुसरी जोडवी होती.
"हे देवघरात होते साहेब..."
सायखेड्यात मंडळी जमली होती. मदन मध्ये बसले, बाजूलाच सगुणा होती.
"सायब, माल सांगा राधेला कुनी मारलं?"
सगुणे, तुझा त्यात हात नव्हता ना...?..मदन नी एकदम विचारले.
साहेब...”ती कशीअसेल खुनी..”.दास्ताने मदन च्या कानात कुजबुजला.
" म्हणजे दास्ताने तू ठरवून टाकलेस खुनी कोण ते..." मदन
"लक्षात ठेव, सांगाडा बरोबर कुठे होता ते सगुणाला माहित होते. शिवाय, महत्वाचा दुवा जी ती अंगठी ती पण सगुणेकडेच होती...."
"साहेब तुम्हाला काय म्हणायचं?...ही..ही सगुणा..." दास्ताने
"मला काहीही म्हणायचे नाही, फक्त जरा विचार कर" मदन
मदन सांगू लागले...
"सगुणा तू ह्यात फार मोलाचे काम केले आहेस. तुझ्या त्या अंगठीने सारे गूढ उलगडले"
"मला नाही समजले" दास्ताने म्हणाला..
मदन सांगू लागले, अजित जव्हेरी हा चोरीचा माल घ्यायचा, विकायचा. त्याने जेव्हा अगदी प्रथम ही अंगठी माझ्या जवळ पाहिली तेव्हा त्याचे फक्त डोळे बोलले माझ्याशी..ते ही त्याच्या नकळत. लगेच मी त्याच्या पेढीवर गेलो. त्याला विश्वासात घेतला आणि पंधरा वर्षापूर्वी झालेल्या एका व्यवहाराची कागदपत्रे गोळा केली."
"हो, तो मला विचारत होता साहेब मला कुठे अडकवित तर नाही ना..."दास्ताने पुटपुटला
मदन सांगू लागले.."
"माझ्याकडे ती जोडवी होतीच फक्त त्यातली दुसरी जोडवी शोधायची होती. मग मी त्या सधन माणसाच्या घराच्या झडतीसाठी हालचाली केल्या आणि पंधरा वर्षापूर्वीचे ते कागदपत्र आणि सापडलेली ती दुसरी जोडवी...अजून काय पाहिजे? अगदी कसलेला गुन्हेगारही यापुढे हातच टेकेल."
"कसले होते ते कागदपत्र" दास्ताने
"थांबा त्याच्या आधी त्या गुन्हेगारालाच इथे कबुलीजबाब द्यायला बोलावू...अरे, त्या गाडीतल्या आरोपीला जरा इकडे आणा"...मदननी हुकुम सोडला
सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळल्या...डोळ्यात उत्कंठा, कुतुहूल...कोण असेल हा आरोपी?
बुरखा होता त्याच्या तोंडावर. आणला त्याला.
मदन एकदम ओरडले..."अरे दलप्या.... सांग तूच उरलेले..." आणि त्यांनी तो बुरखा काढला
गावाच्या लोकाना एकदम कळले नाही हा कोण...दास्तानेला बरोबर कळले..."अरे दलप्या" असे त्याने केव्हा कुठे म्हंटले होते ते....
पण सगुणा मात्र डोळे विस्फारून बघू लागली आणि एखाद्या वाघिणीसारखी पुढे झेपावली..."अरे मुडद्या..दलपत रावा..." लोकांनी तिला सावरले.
दलप्या शरमेने खालीच बघत होता..."सांग हरामखोरा तू श्रीमंत कसा झालास" मदन किंचाळलेच...
"मला क्षमा करा, मला शंका होती की राधेच्या त्या महादेवाच्या शाळिग्रामातच धन आहे...मी ती फोडली आणि ...."
त्याला मधेच अडवून मदन म्हणाले... “मंडळी बाकी सारे उघडच नाही का? “
आणि आरोपीकडे बघून म्हणाले..."चला भानुप्रसाद, तुमची पुढची व्यवस्था लावायची आहे".....
मधुसूदन थत्ते
२१-०३-२०१२