अश्रूंची जातकुळी
अळी मिळी गुप चिळी पहिला बोलेल तो....
मी ६-७ वर्षाचा असेन, मोठी बहिण असेल २ वर्षांनी मोठी. धाक फार तिचा...आज दोघे सत्तर पार ...परवा तिला ह्याची आठवण करून दिली...दोघे मग बराच काळ " गुप चिळी " च्या रम्य राज्यात होतो...
हळूच डोळ्यात अश्रू चमकला. तिने तो पाहिला...म्हणते..."ह्या अश्रूची जात कुळी कोणची रे"....
दूर बनारसला कॉलेज प्रवेश मिळाला. बहिण आणि आई-बाबा होस्टेल मध्ये मला एकट्याला सोडून मुंबईला निघाले, रिक्षात मागे वळून वळून ती पहात होती...साश्रू नयनांनी... मी मनी तिला विचारले ""ह्या अश्रूची जात कुळी कोणची ग?" पण ती सासरी जाताना साश्रू नयनांनी निघाली तेंव्हा समजले ते रिक्षातले आणि हे इथले...एकच जात कुळी की..!!!
मला पदवी मिळाली, विशेष प्राविण्य मिळाले...घरी आधीच कळले होते..आलो तर देवघरात आई..देवाला मनोभावे कांही सांगत असावी. बाहेर आली. माझा नमस्कार घेत म्हणाली "असेच यश मिळव" तिच्या डोळ्यातला अश्रू तिने का लपवला? ती तर वात्सल्याची जात कुळी.
बाबा गेले. त्याना उचलताना फार आक्रोश झाला. देवा ह्या जात कुळीचे अश्रू कोणाच्या वाट्याला आणू नकोस असे अशक्य साकडे मी देवाला घातले.
प्रेमळ पत्नी लाभली. माझ्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू यावे असे घडले कांही वेळा पण नंतर माझी उशी आसवांनी भिजलेली पाहून जी आसवे तिने गाळली...त्या जात कुळीचा अंदाज तरी येईल का तुम्हाला....???
सांगा पाहू या सर्वातील कुठली जात कुळी अधिक मोलाची?
हा प्रश्नच निरर्थक नाही का?
मधुसूदन थत्ते
Friday, March 23, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment