चकवा
"अनंता, ऐक माझे अंधार तुडवत जावे लागेल पुढे. माघारी फिर" सीमेवरल्या पडक्या राउळातून आवाज आला.
चमकून अनंताने त्या दिशेने पाहिले, गुरव होता त्याला सांगणारा.
"बाप्पाजी, मला जायलाच हव. अन अंधाराची काय मला सवय नाही?" ..अनंता
"जा बापड्या, पर दिवटी ने हाताशी.."..गुरव
अनंता मनाशी म्हणाला, ह्याला काय सांगणार? पहाटेचं स्वप्न खरे होते, मला जायला हवे, ह्याला कुठे सांगत बसू सारे?
अनंताने फक्त कानीला अर्धे स्वप्न सांगितले होते.
"बायको आहे, उगीच काही घडले तर तिला माहित हवे कुठे मी गेलो ते." आणि खरी गोम तर त्या न सांगितलेल्या अर्ध्या भागात होती..!!!
झप झप पावले पडत होती. पायाखालची वाट होती.. पण ती दिवसा...आज अमावस्येची काळोखी रात्र..ही वाट चकव्याची तर खरीच..पण हे सारे स्वप्नात गृहीत धरले होते.
एक चकवाच तर मला नेणार आहे त्या जागी....स्वप्नात कोंडाजी तसे म्हणाला होता...
कोंडाजी...अनंताच्या बालपणीच वारला होता पण त्याची ती विचित्र बासरी अनंता कधीच विसरला नव्हता. कोंडाजी तसा वेडा होता पण कधी कधी असे बोलायचा की लोक चक्राऊन जायचे. त्याच्या बासरीतून सुद्धा काही वेळा ज्या ध्वनी लहरी यायच्या त्या आपल्या कान-कक्षेच्या बाहेरच्या असाव्यात. लहानपणी असे काही त्याने वाजवले की राउळा शेजारच्या त्या भल्या मोठ्या पिंपळावरची घुबडे अस्वस्थ होऊन उडायची.
कोंडाजी गेला पण ह्या काही आठवणी कायम ठेऊन गेला आणि किती वेळा तो अनंताच्या स्वप्नात यायचा !!! आज पहाटे मात्र त्याने कहर केला. अनंताला चक्क धमकी दिली...तू हे करून जर मला सोडवले नाहीस तर तुला माझ्या जागी आणून मी मुक्ती मिळवायचा विचार करेन.
...हे काय वेड्याचे बोल? का आम्ही त्याला वेडा ठरवला त्याच्या जिवंतपणी ?
त्या अंधार गुडूप भयाण मार्गावर त्याला त्याच्याच पाउलाचा आवाज घाबरवत होता...प्रतिध्वनी होऊन..
अनंता तसा भित्रा अजिबात नव्हता. राउळामागील पडक्या भिंतीमागे भूत रहाते असे गावकरी म्हणत तेव्हा एक दिवस त्याने गावक-याशी पण लावला...
"अमावास्येच्या रात्री बारा वाजता तिथे जाऊन अर्धा तास बसून ये...आम्ही राउळातून नजर ठेऊ...हरलास तर गाव सोड जिंकलास तर गावाचा तू दुसरा पाटील मानू"
अनंता त्यामुळेच तर गोविंद पाटलानंतर गावाचा पाटील होणार होता.
पण आज हे सारे वेगळे आणि विचित्र होते.
"चकवा....चकवा...अरे नेहेमी लोक तुला घाबरतात आज मी तुला हाका मारतोय ये, दाखव मला मार्ग घुबडाच्या ढोलीचा ....होय, कोंडाजीची शपथ तुला...." हे अनंताने म्हटले इतक्यात उजवीकडच्या झाडीत काही चमकले..."काय...? अरे हे तर काजवे..चकव्याची दिवटी हव्ये मला"...
अंदाजाने त्याच्या लक्षात आले की झरणा नदीचा प्रवाह फार लांब नाही आता...
"नदीच्या आसपास चकवे हिंडतात ...माझा चकवा इथेच असेल जवळपास"...
इतक्यात त्याला कोंडाजीची ती विचित्र बासरी वाजतेय असा भास झाला, घुबडाचा आवाज...? हो तो ही भास झाला....नव्हे हा भास नव्हे...आणि इतक्यात...
प्रकाशाचा कल्लोळ होऊन चकवा उमटला अंधारात...
अनंता जणू चकव्याचे बोट धरून निघाला..काटे कुटे, दगड, धोंडे तुडवत, रक्त बंबाळ होत अनंता निघाला...किती चालला, कसा चालला, कुठे चालला कोण सांगणार?
इकडे, राउळात कानी काही माणसाना घेऊन आली होती.
"मी त्याला संगितले जाऊ नकोस...पण गेला..काही बोलला नाही".. गुरव
"अहो, कसलं बघा सपान होते म्हने, म्हनालं हाती हंडा घेऊन यीन, कोनाला सांगू नगस "
सर्वदूर कुजबूज सुरु झाली, म्हणता म्हणता शंभर माणसे गोळा झाली.
इतक्यात एक अति ओंगळवाणी कर्कश किंकाळी अनंता गेला त्या दिशेने आली.
काठ्या, कुऱ्हाडी सरसाऊन गावकरी धावले, बत्त्या आल्या थोडे आतपर्यंत गेले.
कुठे काय....चिटपाखरू देखील नव्हते. तासभर थांबून गावकरी परतले.
कानी बिचारी आली माघारी पण मन तिथेच ठेऊन आली, राउळातच जरा निजली.
अगदी भल्या पहाटे कानी उठली, तरा तरा निघाली अनंताच्या दिशेने...चालली चालली खूप चालली सूर्य आता वर आला होता झरणेचा किनारा आला.
झपाटल्यागत कानी आता धावू लागली पण पायाला काही लागून धडपडली..वर तोंड करून पहाते तो काय अनंता तिथे पडलेला, अनंतात विलीन होऊन. त्याच्या हातात एक बासरी...आणि...आणि..
त्याच्या डोक्यापाशी होता एक हंडा...मोहोरांचा...
मधुसूदन थत्ते
२७-०२-२०१२
Friday, March 23, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment