Tuesday, July 15, 2014

ट्राम...
======

केवढे आकर्षण होते मला ट्रामचे..
खोदादाद सर्कल (म्हणजे दादर टी टी ) ते बोरीबंदर तिकिट एक आणा...(तेव्हा नवे पैसे नव्हते अस्तित्वात)

मी होतो तेरा वर्षांचा..जात असे ट्रामने कधीकधी शाळेत...ग्रांट रोडला...Lamington रोडला उतरायचं..पाच मिनिटावर Robert Money शाळा..

एकदा ट्रामच्या ड्रैव्हर च्या अगदी लगतच्या सीट वर होतो..फारशी काय..अजिबातच गर्दी नव्हती..

उठलो आणि त्या फेटा बांधलेल्या ड्रैव्हर चा शेजारी गेलो..

"मी राहू का इथे उभा जरा वेळ" अशी परवानगी मागितली..

काय मज्जा आली तेव्हा..!!

त्याच्या हातात एक लिवर होती..ती तो हलके ह्या त्या बाजूला फिरवून वेगावर नियंत्रण ठेवायचा (खूप पुढे कळले की त्यामुळे तो सिरीज मोटर चा current कमी जास्त करायचा.)

त्याच्या पायाखाली एक बटन होतं..ते दाबून ती टिंग टिंग अशी घंटी वाजवून मार्गावरल्या लोकांना सावध करायचा...काचा बिचा कुछ नही सगळा मोकळा व्यवहार..अन हा उभाच्या उभा..

रस्त्यावरचे लोकसुद्धा आरामात रस्ता क्रॉस करायचे...हे एवढे धूड येताय ह्याची त्यांना परवा नसायची..accident तसे नाही व्हायचे... .

मग stop आला की मी चालत्या ट्राम मधून उतरत असे..मला होती ती सवय...

बोरीबंदरला ट्राम पुन: परतायची..त्यासाठी कंडक्टर खाली उतरायचा...ट्राम च्या शिरावर एक लांब दांडी असायची. तिच्या टोकाला एक चाक..जे रस्त्यावर कायम तोरण बांधल्यागत खोदादाद सर्कल ते बोरीबंदर अशा असलेल्या केबल वर जाऊन बसायचे...circuit complete व्हायचे...

तर हा कंडक्टर ती लांब दांडी हाताने ओढून विरुद्ध दिशेला आणायचा...झाली reverse गतीची तयारी..

मग टिंग टिंग केलं की ड्रैव्हर माघारी खोदादाद सर्कलला जायला निघायचा,,

मित्रांनो असे होते आपल्या मुंबईच्या commuting चे साधे सोपे आणि स्वस्त रूप..

आज ट्राम हव्या होत्या नाही का? कलकत्त्याला आहेत ना अजून...

मधुसूदन थत्ते
११-०७-२०१४



तेव्हा आणि आज...

काळाने मलाच माझ्यापासून किती दूर न्यावे...!!!

पन्नास वर्षे हा पूल इथे असाच आहे...ते आभाळ...तेच आहे...मी मात्र तेव्हा दूर क्षितिजापार जाईन म्हणाले...
आज पण क्षिताजापार जाईन म्हणत्ये..

पण ..तेव्हाचे क्षितीज वेगळे होते...आजचे वेगळे आहे..

तेव्हाच्या क्षितिजाला ऐलतीर पण होते आणि पैलतीर पण होते

आजच्या क्षितिजाला फक्त पैलतीर आहे..

तेव्हा मी जमवत होते…हे..ते...आणखी तिकडचे..मग हा विचार...तो विचार..त्यापलिकडचा विचार..
पण
आज मी एक एक करत सोडून देते आहे...टाकून देत आहे...मोकळी मोकळी होत आहे...रिकामी होत आहे..

हो मनातले विचार सुद्धा काढून टाकत आहे...

आज ते जमतय...तेव्हा ते जमणं अशक्य होतं...

मधुसूदन थत्ते
१२-०७-२०१४


कोमल रिषभ...तीव्र मध्यम 
===================

कमला तशी तिच्या आईबाबांजवळ खेड्यात फारशी राहिली नव्हती. दहा वय झालं आणि शिक्षणासाठी पुणे-मुंबई अन नंतर अमेरिका.त्यामुळे गावाच्या स्मृती तेवढ्याच. पण पाटी कोरी असते ना तेव्हा...अजून उमटलेलं पुसलं नव्हतं गेलेलं..

धनिक जमीनदाराची ती लाडकी एकुलती एक कन्या... 

बालपणीच्या वास्तव्यातल्या दोन व्यक्ती तिच्या मनात कायम घर करून राहिल्या..
एक पंडित शिवराज व्यास...गायन मास्तर 
आणि 
दुसरे बाबूमामा ...जे दिवसभर कमलाच्या घरीच असायचे..तिला गाणी म्हणून दाखवायचे..गोड गोष्टी सांगायचे...

व्यासांनी सांगितलेल्या काही गोष्टी संगीताशी निगडित होत्याही आणि नव्हत्याही...तिला ते चिमणी म्हणायचे..."हं दाखव गाऊन" ऐवजी "कर बघू आता तुझी चिव चिव" म्हणायचे..

"चिमणे...यमन रागाचं काय वैशिष्ठ्य?"

"गुरुजी..त्यात दोन्ही मध्यम येतात..एका साधा अन दुसरा तीव्र..."

नाही..आरोहातला "म" अवरोहात तीव्र होतो"..गुरुजी..

मग म्हणायचे 

"पोरी इतरत्र जसे तसेच संगीतातही तीव्र स्वर असतो बरं."

आज वयाच्या बाविसाव्या वर्षी कमला खेड्यात परतली होती..१-२ महिने रहाणार होती..१६ वर्षांनी इतके रहायला मिळणार होते.

पहिल्या आठवड्यात ती व्यास गुरुजी आणि बाबूमामा..दोघांनाही लगेच भेटून आली..दोघेही १६ वर्षांचा भार शिरावर घेऊन जरा वाकल्येत हे दिसले तिला.

गुरुजींनी ती पुढे गाण्यात काय काय शिकली हे जाणून घेतले आणि बाबूमामा तिच्या माथ्यावरून हात फिरवीत आशीर्वाद देत तिला म्हणाले होते..

"बबडे , अजून गोष्टी सांगू का? निजतांना गाणे म्हणू का"

दहाएक दिवस उलटले असतील..एकदा वाड्यात बाबांनी चार दोन लोकांना शेतीबद्दल काही सांगायला बोलावले होते. कमला बाजूच्या खोलीत वाचत बसली होती..

मिटिंग झाली..सारे गेले आणि एकटे बाबूमामा आणि बाबा राहिले..

"बाबुराव..केव्हा अक्कल येणार तुम्हाला?" बाबा असे रागावलेले तिने कधीच पाहिले नव्हे..ती हळूच भिंतीपाशी जाऊन ऐकू लागली.

"नांगरणी व्हायलाच हवी..कारण पुढे करू नका..आधीच गेला आठवडा वाया घालवलात..."

"धनी, बैलाचा पाय दुखावलाय..पण लावीन त्याला नांगराला..फक्त अजून चार दिवस द्या.. होईल पाय तेवढ्यापुरता बरा..." बाबूमामा

"बाबूराव अखेरचे सांगतो..उद्या नांगरणी सुरू झाली नाही तर ह्या घरात पुन: तुम्ही यायचे नाही. आत्तापर्यंत तुमच्या पुष्कळ चुका आम्ही नजरेआड केल्या..इथून पुढे नाही..." बाबा असे म्हणून फणका-याने बाहेर निघून गेले..

कमलाने सारे ऐकले होते. बाबूमामांची हकालपट्टी तिला सहन होणे शक्यच नव्हते..तिने बाहेर येऊन जणू काहीच ऐकले नाही असे दाखवत सहजच म्हटले, "मामा, उद्या मी येऊ का शेतावर? मला पाहायचं आहे सारं 

"कमलाताई...उद्या नको..मी नेईन तुम्हाला नंतर..."बाबूमामा

"मामा...हे कमलाताई काय? आणि मला अहो जाहो? मामा मी तुमची बबडी ना?" कमला म्हणाली

बाबूमामा काहीच न बोलता एकदम निघून गेले.

दुसरा दिवस उजाडला...सकाळीच कमला आईला सांगून बाहेर पडली.."आई, आज किती छान हवा पडल्ये...मी जरा नदीकाठची शोभा पाहून येते..."

कमलाने नंतरचे दोन तास कसे अन कुठे घालवले..कुणाच्या ध्यानी येण्याचं कारणच नव्हतं..

सुमारे दहा वाजता ती त्यांच्या शेतावर गेली..

जे पाहिलं त्याने तिला फार मोठा धक्का बसला...

एका बाजूला बैल अन दुस-या बाजूला बाबूमामा...नांगराला जुंपले होते आणि नांगरणी सुरू करणार होते...!!!

डोळ्यातला पाणी पुसत धावत ती तिथे पोचली.. बाबूमामांना रागावली..

"मामा..हे काय करताय? बाहेर या आधी..."

"ताई...बैल नाही चालत हो...अन आज नांगरणी झाली नाही तर धनी मला पुन: घरात घेणार नाहीत... 

कमलाने उंच हात करून हाक मारली...धोंडीबा...लगेच या...

व्यासगुरुजींच्या शेतीचे बैल घेऊन त्यांचा धोंडीबा दुरून येतांना दिसला...

संध्याकाळच्या सभेवर बाबा, बाबूमामा आणि चार दोघे जमले होते

"बाबूमामा... टिकलात तुम्ही कमीतकमी अजून काही दिवस...असं ऐकतो आहे की आज नांगरणी केलीत तुम्ही.."

"हो धनी...देवाच्या कृपेने आज नांगरणी झाली..." इतक्यात कमला आतून बाहेर आली. तिने बाबूमामांना "चूप रहा" असे बोटाने खुणावून सांगितले..

तसं नवीन काहीच नव्हतं सांगा-ऐकायला...गेले सारे..बाबाही बाहेर गेले.

इतक्यात आईची हांक आली

"बाबुराव हे घ्या चार घास खाऊन जा...आणि हे घरी न्या मामीसाठी...आज माझे अष्ट-मंगळवाराचे व्रत संपले..गोड भात केला आहे"...

बाबूमामा आत आले खरे पण अचानक त्यांनी हम्बरडाच फोडला..

"यमे.. अगं भाग्यवान गं मी...मला किती गोड नात दिलीस...!!!"

आईला काहीच उमगेना...कमलाने मग सारा वृत्तांत सांगितला..व्यास गुरुजींनी तात्काळ बैल द्यायला कसा होकार दिला ते सांगितले..

जेवण उरकून शांत मनाने बाबूमामा घरी गेले..कमला आणि आई दोघीच होत्या आता तिथे..

"आई एक सांग...तुला त्यांनी 'यमे' कसे म्हटले? आणि मी काय त्यांची नात???"

आई उत्तरली..

"कमळे, बाबूमामा हे खरे माझे सावत्र मामा आहेत बरं..."...!!!!!!!

कमलेला आत्ता व्यासगुरुजींचे एक वाक्य आठवले..
"चिमणे...तीव्र ऐवजी कोमल स्वर नेहेमी जवळ करावे...जसा यमनला कोमल रिषभ कसा हळूवार करतो आणि पूरिया कल्याण तयार होतो..."

मधुसूदन थत्ते
१५-०७-२०१४

Tuesday, July 8, 2014

असाच अन मी इथे खेळलो दर्याकाठी कितीदा
शंख शिंपले गोळा केले अलगदसे मी कितीदा...||
एक एक स्मृती जपुन ठेवल्या शंख शिंपल्यात
उघडू म्हटले खजिना नंतर भविष्य काळात ||
बबडी, छबु बाबू गुंड्या नावे मम मित्रगणाची
असेल कारे तशि जपलेली स्मृती प्रत्येकाची? ||
दशक सहा पडली अजि मागे कुठे कोण कोण?
तुझाच तू एकला माणसा केवळ हे जाण. ||
मधुसूदन थत्ते
०८-०७-२०१४

Wednesday, July 2, 2014

पर्वती आणि मी
============

आज सुमारे दहा वर्षानंतर मी पर्वतीवर जाणार होतो. आलं मनात, निघालो...पत्नी म्हणाली पायथ्यापर्यंत कार न्या आणि मग चढा हवे तर..

नो.... कार बीर कुछ नाही...शेवटी “रिक्षा तरी करा” एवढे ऐकून जाताना केली रिक्षा...

पर्वती बदलल्येय..Modern करायचा निष्फळ यत्न...!!!

पहिल्या दहा-वीस पाय-या गेलो तर खरा पण मन ब्रेक लावू लागलं... "आता सहा आठवड्यात तू ७४ पूर्ण होशील...एकटा आला आहेस...जपून रे बाबा..."

मंदावला की वेग.

इतक्यात मागून माझ्याच वयाचा एक घामाघूम झालेला माणूस येऊ लागला...आला... मला पास करून गेलाही...!! बाजूची विक्रेती बाई म्हणाली बाबांची ही दुसरी फेरी आहे...रोज तीन चार तरी मारतात...

मी मोठ्या आदराने त्याची पाठमोरी आकृती पाहून माझा वेग किंचित वाढवला..

मध्य टप्पा आला...तुळशी वृन्दावनाचा....

अहं.बसायचं नाही....म्हटलं पण जरा थबकलो..

इतक्यात वरून उतारावरून वेगाने येणारा तरूण घसरला...पडला...उठला..पण मला उपदेश करून गेला..."काका, येताना चपला काढा..मी काढल्या नाहीत म्हणून पडलो..."

पार वर असाच रमत गमत गेलो...देव देवेश्वराच्या मंदिराच्या भोवती..

माझ्याकडे भीमसेनजींच्या "मल्हार-मैफलीची" एक व्हिडिओ क्लिप आहे...बहुतेक किर्लोस्करांच्या घरी खास अशी १९६०-१९६२ च्या दरम्यानची आहे...

त्यात पंडितजी चिमुकल्या मुलांना घेऊन ह्या आवारातल्या गजांच्या कोनाड्यात खोल खाली असलेले पुणे पहातांना दाखवले आहेत.

आज मी मुद्दाम त्या जागी क्षणभर उभा राहिलो..

हवेत आज होता खरा खरा खूप गारवा
अन
मल्हार ऐवजी माझ्या कानावर आला काल्पनिक मारवा....

मनसोक्त फिरलो त्या आवारात...

माझे पूर्वी इथे नित्य येणं असायचं..पश्चिमेकडच्या मन्दिरामागची माझी आवडती जागा आहे...आज सूर्यास्त तिथे पहायचा होता मला..

गेलो...

परिसर खूप सारा बदलला आहे आज..

पण..मी बसत असे ती मोठी शिळा तशीच आहे...मी बसलो मिनिटभर. खूप शांत वाटले. जणू त्या शिळेने मला ओळखलेच !!!

उतरतांना चपला मात्र काढल्या नाहीत...पडलो बिडलो नाही पण पुन: अनुभव आला...एकदा उतरंडी लागली की माणूस झपाट्याने खाली येतो...तसे होऊ नये म्हणून तर प्रयत्न करायचा...!!!!

घरी परतायचे आहे पण कसे? रिक्षा करू का? इथून बिबवे वाडी ४-५ कि.मी. दूर अन तशी एकही बस नाही...काय करावे?

मनाने ठरवले चालतच जायचे...अन निघालो...वाट मात्र अगदी आडवळणाची घेतली कारण त्या वाटेने मी ३०-४० वर्षांपूर्वी पर्वतीला येत असे...

पाहू तरी तिथला भूगोल बदललाय का ते..

पुण्यात भूगोल असा सहजी बदलत नसतो..जुनी घरे पाडत नसतात..गल्ल्या-बोळ काढत नसतात...

खरं म्हणजे मला माझ्या चिमुकल्या स्वातीची शाळा अजून आहे का ते पहायचे होते...स्वाती होती चार वर्षाची अन ती होती तिची पहिली शाळा...

शाळेजवळ आलो...वाटलं शाळेची चिमुकली इमारत म्हणेल...किती वर्षांनी आलात...!!! शारदा देवीची छोटी मूर्ती तिथे भिंतीवर असायची पूर्वी...

इमारत होती..भिंत होती..पण शारदेची मूर्ती मात्र नव्हती..

कशी असेल? शाळाच नव्हती तिथे आता...!!!!

रमत गमत घरी आलो..खूप खूप समाधान वाटलं....मी पर्वती चढलो-उतरलो-अन---चालत बिबवेवाडीला आलो..!!!

मधुसूदन थत्ते
२९-०६-२०१

नच सूर्योदय हा तर वणवा 
नष्ट करितसे वन-अस्तित्वा 

इदं न मम अग्निस द्यावे 
यज्ञकुंड जणु पेटत जावे 

घर्षण ठिणगी निमित्त व्हावी
हां हां म्हणता पसरत जावी..

उत्पत्ती-स्थिती-लय चक्राची
चाल धरेवर नित-नेमाची

मधुसूदन थत्ते
०१-०७-२०१४
चित्र इ-मेल वरून.
(Dor Kedmi Captures the Beauty of a Forest Fire in Jerusalem)