Friday, June 26, 2015

हिरवी संध्याकाळ...जणू खचून भरलेत पाचू..

मी आणि असेच एक दोघे उरलो होतो ह्या गिरीमाथ्यावर...सूर्यही नव्हता..कसा असणार श्रावणी सांजेला..?

थंड हवेची एक लहर म्हणाली…"उठ ही माझी जागा वावरायची"

उत्तरादाखल मी आय पॅड लावला..

कुमारांचा सोहोनी.."रंग ना डारो शामजी..."

हवेची लहर मग त्या ताना घेऊन दूर पळाली..

मुलायम तलम अशी तानेची हलकी फेक...जशी सागर किना-याला लाजत लाजत येणारी जललहर... जाताना तळव्याना गुदगुल्या करणारी...

कुमारांची तान गेली मनाला गुदगुल्या करून ...मधेच कुमारांनी अशी काही मध्य षड्जावरून वरच्या सप्तकात झेप घेतली...

जणू गरुड झेप...

ते ऐकून गगनातला खरा गरुड सुद्धा असा झपाट्याने एकदम वर गेला.

"तुला रे काय ज्ञान ह्या स्वर्गीय गायनाचे"..मी त्याला हटकले..

"ची ची ची..." गरुड उत्तरला
"ठाऊक कसले...तानेच्या ह्या लहरी अशा काही आल्या वातावरणात की मलाच वाटले द्यावे कुमारांना उत्तर एक सुरेख आभाळात झेप घेऊन"

गाणे संपले होते...गगनाने गुलाल उधळावा तसा अंधार उधळला...

आता मी एकटाच होतो...

नाहीतरी एकटाच आलो--एकटाच जायला हवे नाही का...???

मधुसूदन थत्ते
15-05-2015

Tuesday, June 23, 2015

असे देखिले मी..असे जाणिले मी..
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
रुपाल शेठ मोठे कापडाचे व्यापारी होते पुण्यात..
एक दिवस त्यांचेच एक व्यापारी मित्र एका अठरा-वीस वयाच्या मुलाला त्यांच्याकडे घेऊन आले...
"अरे रुपाल, ह्याला दोन महिने ठेव कामाला...तुझ्या इतर सेल्समन बरोबर करेल काम त्यांचा मदतनीस म्हणून...येईल मात्र रोज संध्याकाळी चार तास"
रुपालने एकदा त्या मुलाकडे पाहिले. सोज्वळ दिसला..... डोळ्यात तेज दिसले पण गरीब परिस्थितीतला असावा...चेहेराच सांगतो तसे..उंच, गोरा आणि नीटनेटके कपडे होते त्याचे...त्यांनी त्याला जास्त काही विचारले नाही कारण त्यांच्या मित्रानेच त्याला आणला होता...नाव मात्र विचारले..
"विनायक...आपण मला विनू म्हटले तरी आवडेल" मुलगा म्हणाला..
"उद्यापासून ये मग विनू ...आणि पगार इतरांच्या निम्मा मिळेल ..."
"नको..मला पगार नको शेठजी..मी नुसता कामाचा अनुभव घेणार आहे..." विनू
रुपालच्या मित्रांनी विनूला सांगून पाहिले की असे फुकट काम करू नये...रुपालही तसेच म्हणाले पण विनू पुन: नम्रतेने म्हणाला..."अहो खरेच नको...फायदा माझाच आहे...मला नाही का अनुभव मिळणार...?"
एक दोन आठवड्यातच रुपाल शेठना कळून चुकले हे पाणी काही वेगळेच आहे...
विनू आता सर्वांचा मित्र झाला होता..खूप मेहेनत करत होता..अधून मधून रुपाल शेठना व्यवसायातल्या काही बारकाव्याबद्दल तो विचारीत असे... त्यांच्या इतर सेल्समनच्या डोक्यातही येणार नाहीत अशा शक्यता विनायक कल्पना करून मांडत असे आणि चर्चा करत असे..रुपाल हळू हळू त्याला अशा काही क्लुप्त्या सांगत ज्या ते इतर कुठल्याच सेल्समनबरोबर कधीच बोलले नव्हते..
दोन महिने होत आले होते..
एकदा पुण्यातले असेच परांजपे नावाचे एक बडे व्यापारी रुपाल शेठकडे आले...त्यांच्या गप्पा रंगत आल्या..
"विनू, अरे जरा पाणी सांग आणि चहा पण सांग..." त्यांनी विनूला फर्मावले...
"विनू आत्ताच बाहेर पळत गेला शेठ...बहुतेक कोणाला तरी भेटायला गेला मागल्या दारातून...
एक बडे व्यापारी आले असता हा पळाला...रुपालना नक्की ह्यात काळेबेरे वाटले...बहुतेक विनू परांजप्यांकडे कडे नोकरीला होता आणि काहीतरी फसवा-फसवी करून पळालेला असावा....त्यांची नक्की खात्री झाली..
"येऊ दे त्याला परत..पोलिसांकडेच देतो" असे ते म्हणाले खरे, पण विनू नंतर आलाच नाही...दुस-या दिवशीही आला नाही...
रुपालनी मित्राला फोन लावला...
"अरे तू आणलेस म्हणून मी त्या चोराला दुकानात ठेवले..पण काल परांजपे शेठ आले असता हा बाहेर पळाला..आजही आला नाही..तोंडच दाखवले नाही त्याने...मी पोलिसात वर्दी देणार आहे.."
मित्र क्षणभर गप्प होता..मग म्हणाला..
"एक दिवस थांब..मी आणतो त्याला उद्या तुझ्याकडे...असा त्याला सोडायचा नाही आपण पण अजून पोलिसांकडे मात्र जाऊ नको"
दुस-या दिवशी मित्र आणि विनू रुपालच्या दुकानात हजर..
मित्र विनूला म्हणाला..."काय रे असा चोरासारखा पळून का गेलास ते सांग आता ह्या शेठना..."
"काका...अहो मी तुम्हाला आधीच नवते का सांगितले...की..ज्या दिवशी माझ्या बाबांना मी इथे दिसेन त्या दिवशी हे नाटक बंद...!!! आठवतय ना?"
नाटक..? रुपाल बघतच राहिले..
इतक्यात स्वत: परांजपे शेठ तिथे आले..
"रुपाल...अरविंद हा माझाच मुलगा...इथे विनू म्हणून राहिला आणि हे नाटक मलाही खरेच माहित नव्हते..."
घरी गेल्यावर अरविंद बाबांना म्हणाला...
"बाबा..ते सेल्समन काय आणि कसे बोलतात..त्यांच्या सवयी, लबाड्या...हे जसे मला ह्या दोन महिन्यात कळले तशा त्यांच्या ट्रेनिंगच्या गरजा आणि कशा प्रकारच्या अपेक्षा ठेऊन ते असतात हे मला चांगले पहाता आले...आपल्या दुकानात मी नक्की ह्या नव्या ज्ञानाचा उपयोग करीन.."
परांजपे मोठ्या कौतुकाने अरविंदकडे पहात होते...
मधुसूदन थत्ते
२३-०६-२०१५
(एका सत्य घटनेवरून..नावे आणि काही प्रसंग बदलून लिहिलेली ही घटना आहे)

Saturday, June 13, 2015

NO..No..No No...मला कुठल्या TV सिरियलवर लिहायचे नाही मित्रांनो..

ती एक कोकणातली अविस्मरणीय कथा आहे...वाचावी आपण पुढे..

खूप जुनी गोष्ट...६५ वर्षापूर्वीची...त्यातली मी धरून फक्त २-३ पात्रे आज ह्यात आहेत...

आम्ही दादरहून तळकोकणात गेलो होतो..मी, माझे आई-बाबा आणि एक शेजारची १८ वर्षाची नववधू ...नाव कुसुम...

गरती कुसुम माहेराला आली अन कावीळ झाली...    घरी एकटी आई...त्यात ती होती लंगडी..पण पक्की तळकोकणी मात्र... 

काविळीवर उत्तम उंपाय करणारे तिच्या गावी होते एक गृहस्थ... पण कुसुमला न्यायचे कोणी अन कसे..?

अशा वेळेला माझे बाबा सदैव जबाबदारी घ्यायला तत्पर असायचे...अन अशा प्रकारे आम्ही चौघे पोचलो त्या तळकोकणातल्या 

खोलखंडोबाच्या गावी...

चौकशी केली..त्या गृहस्थाना भेटलो...त्यांना अण्णा म्हणत. अण्णांनी आमची सोय शेजारच्या मोकळ्या अन टुमदार घरी केली..

काय सुरेख घर होते ते..मला अजून आठवतय तो समुद्राचा गाज..वा-याची फडफड...आणि घराच्या झरोक्यातून अधून मधून येणारी फू 

फू....वा-याचा झरोक्याताला तो आवाज अजून माझ्या कानात आहे

...
पण त्याचे कारण वेगळे आहे..

लगेच औषध सुरु झाले..तो होता मंगळवार. 

"
एक दिवस अजून थांबा..मी उद्या तपासतो अन मग जा मुंबईला".. अण्णांची आज्ञा झाली 

दिवेलागणीला डावीकडे सूर्य पाण्याला टेकत होता तोच दारी शेजारची एक नववधू आली.गरती होती. सुरेख असे नऊ-वारी लुगडे..नाकी

 नथ..हाती झाकलेले असे काही ...अन मधुर आवाजात आईला म्हणाली..


"
आई, नमस्कार करते..." अन तो सुंदर असा वाकून तीन वेळा केलेला नमस्कार..हल्ली दिसत नाही असा फारसा..

"
मला कळल आलात..मी शेजारचीच आहे..अण्णांच्या पलीकडची..मोदकाचा प्रसाद आणलाय.."

तिने रुईच्या पानातला तो प्रसाद आईला दिला ..."

"
अगं आत ये, बस जरा..." माझी आई म्हणाली..

"
नको..आधीच उशीर झालाय...मैत्रिणी जमल्यात तिथे पारावर..."...ती उत्तरली...कुसुमकडे पाहून गोड हसली अन झाली पसार...

जरा वेळाने अण्णाही आले... "हा अंगारा घ्या..कुसूमला निजताना लावा नक्की..."

निजायची वेळ झाली...

काय उंदीर होते त्या परिसरात...असे सुळकन पळायचे इकडून तिकडे...

माझ्या आईने मोदकाचा प्रसाद आणि अंगारा ईशान्येला कोप-यात ठेवला ...देव असतात ना त्या दिशेला...!!!

मध्यरात्री केव्हातरी खूप वारं सुटल्याचा आवाज होत होता...भिर्र भिर्र.फर्र फर्र...

मी जागा तर झालो पण भीती वाटत होती..हळूच एक डोळा उघडून वर पाहिले ..झरोक्यातून आवाज येतच होता वा-याचा...भिर्र भिर्र

.फर्र फर्र...च्या जोडीला फू फू....!!!!


सकाळी ईशान्येच्या कोप-यात आई देवाला नमस्कार करायला आणि कोप-यात ठेवलेले मोदक आणि अंगारा घ्यायला आई जाते तो 

काय...उंदरांनी मोदक पळवले होते की...!!!

आज आम्ही निघणार परतीला..निरोपासाठी अण्णांच्याकडे...जायचे..तर मधेच आई थबकली...

"
ती कालची मोदक देणारी मुलगी मी ह्या घरात पाहिली...चला जरा भेटन येऊ..."


गेलो घरात...मंगळागौरीच्या गाण्यातले बसफुगडीचे गाणे गोड आवाजात ती मुलगी म्हणत होती.. फू बाई फू फुगडी फू...फू बाई फू 

फुगडी फू...आणि सुंदर खळखळून हसली.
..

आईने ओळख करून दिली-घेतली..

"
काय गोड आवाज आहे हो तुमच्या मुलीचा...बोलावता का तिला....??"...आई म्हणाली..

"
माले...ये ग जरा बाहेर..." हाक दिली आईने..

मालू आली....अन...अन...लंगडत आली..तिचा एक पाय अधू होता..!!!!

आई पहातच राहिली...म्हणणारच होती "तूच काल आली होतीस ना...??" पण थांबली..

मालूची आई पुढे झाली...म्हणाली..

"
काकू..एका अपघातात हिचा पाय गेला...अन काय सांगू...हिची जुळी बहिण त्यातच गेली...गरती होती हो...!!!"

आई नुसती हसली...आम्ही निरोप घेतला...सर्वांचाच...मालूचा, तिच्या आईचा आणि अण्णांचा...

मी आईला हळूच म्ह्टल्याच मला आठवतय..

"
आई..ते मोदक उंदरांनी नव्हते हो खाल्ले...!!!"....अन आईने मला गप्प केले...

कुसुम समोर हे बोलायचे नव्हते ना......!!!!!!!!

(
माझी संपर्ण स्वतंत्र कथा..आत्ताच लिहून पूर्ण केली 
) 
Representative pictures taken from Google.

मधुसूदन थत्ते 

२६-१२-२०१४