Saturday, June 13, 2015

मला भेटलेला गोपू 
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

गोपूला सारे अर्धवट म्हणत असावेत ...बरळायचा ना असंबद्ध...

ठेंगणासा, कंबरेवरची उंची जास्त...खाली कमी...मग बावळट दिसायचा...

सारखेच बोलायचे म्हणून तोंड उघडे ठेवायची संवय..!!! आवाज घोगरा...

त्या गावात मी तसा नवीन त्यामुळे फारसे जाणेयेणे नव्हते..गोपूने स्वत:च एकदा घरी येऊन ओळख करून घेतली माझ्याशी...

म्हणाला, काका, तुम्ही फार ज्ञानी आहात...!!!

"
तुला रे कसे कळले?"...मी.. 

"
असेच.." तुम्ही ना मागच्या कुठच्यातरी जन्मी नक्की Galileo होतात... म्हणून विचारतो...अन पुढे म्हणाला

"
मृगाच्या galaxy मध्ये आजही तारे नवे होतायत.. तो जो पोटात बाण आहे व्याधाने सोडलेला, तिथेच...नेमके तिथ्थे ह्या क्षणालाही तारे जन्म घेत आहेत...!!!"

ह्यानंतर गोपू मिनिटभर खूप काही पुटपुटत राहिला....त्यात मला स्फेरिकल हा एकच शब्द समजला... 

गंमत म्हणून मी त्याला काही विचारणार इतक्यात तो आला तसा गेलाही...

एक दिवस आला म्हणाला "काका, तुम्ही रात्री बाराला नदीकाठच्या पिंपळपारावर जायला घाबराल?"

मी लगेच म्हटले, "तू बरोबर असशील तर कसा घाबरेन? .."

"
तसे नाही...एकट्याने जायचे...मुंजाला भेटायला एकट्यानेच जायचे असते... "

"
म्हणजे तिथे मुंजा असतो तर...!!! म्हणून सांगतोयस ना मला घाबरायला..."...मी 

"
नाही...एक प्रयोग करायचा आहे...तुम्ही ज्ञानी आहात म्हणून तुम्हाला सांगतोय..." गोपू..

"
प्रयोग..??" ..मी

"
हो...ज्याला मुंजा रडतो आहे असे ऐकू येईल त्याचा काही उपयोग नाही अन ज्याला मुंजा वेणू वाजवताना ऐकू येईल त्याने फक्त तीन टाळ्या वाजवायच्या...बस...पुन: गावात मुंजा दिसणार किंवा भासणार नाही..."

आज गोपू अजिबात असंबद्ध बोलत नव्हता...!!!

"
केव्हा जाऊ सांग?"...मी..

"
आज...आज अमावास्या आहे म्हणून..."..गोपू...

"
नक्की जाल का?...."

"
अरे पण तू का एवढा अधीर झालायस त्या मुंजाला सोडवायला...??"...मी 

उत्तर द्यायला गोपू थांबलाच नाही...अस्सा तडक गेला ...मला तर त्याचे घरही माहित नव्हते...कुटुंबात कोण कोण आहेत हेही माहित नव्हते...

पाहू पुन: कधी...आज तर तो म्हणतो तसे रात्री बाराला पारावर जाऊ...से म्हणत मी घरात शिरलो...जेवण वगैरे उरकले...अन बसलो बाराची वाट बघत..

जरा आधीच गेलो...अंधार तर होताच...नदी संथ वहात होती..एक दोन वटवाघळे फडफडली..मी पाराच्या जवळ इतक्यात गेलो नाही...

कुणीच नव्हते आजूबाजूला...

मला तशी भिती कधीच वाटली नव्हती भुताखेताची..बघू म्हटले..आज एक भूत तर दिसेल...!!!

बारा वाजत आले...अचानक वारा सुटला...पिंपळ सळसळला...त्यावर बहुतेक अनेक वटवाघळे असावीत कारण वर फांद्यांमध्ये बरीच हालचाल दिसली...

माझ्या डाव्या खांद्यावर काही स्पर्शून गेल्याचा भास झाला...असेल एखादे वटवाघूळ आणिक काय...? मी दुर्लक्ष केले..

अन..

त्याक्षणी मला अतिशय मधूर असे वेणूचे सूर कानी आले...जणू गोपाळ कृष्णच कुठेतरी केतकीच्या बनात अदृश्य राहून वेणू वाजवतोय असे वाटावे..

मी भानावर आलो अन तत्क्षणी गोपूचे बोल मला आठवले,,,

तीन टाळ्या...!!! वाजवल्या मी तीन वेळा टाळ्या...

मी घरी कसा आलो हे स्मरत नाही...पण सकाळी उठलो तो तडक गोपूला शोधायला गेलो...मला कुठे त्याचे घर माहित होते..

मग चौकशी आरंभली...

कोणालाच तो माहित नव्हता...!!! पण रात्री पारावर कुणी कधीही जात मात्र नव्हते...

"
तिथे मुंजा असतो अन तो सारखा रडत असतो" काही वृद्ध सांगू लागले...

सहा महिन्यांनी जेव्हा मी तिथे पुन: कामासाठी गेलो तेव्हा गावकरी आनंदाने सांगू लागले..

"
आताशा नदीकाठचा पार पूर्णपणे.रिकामा झाला आहे ..आम्ही तिथे मंदिर बांधणार आहोत..."

पण...गोपूचे काय...?

गोपू कुणालाच माहित नव्हता...

मधुसूदन थत्ते
१३-०५-२०१

(
स्वैर अन स्वतंत्र कथा...आत्ताच लिहून संपवली. )

No comments: