असे देखिले मी..असे जाणिले मी..
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
रुपाल शेठ मोठे कापडाचे व्यापारी होते पुण्यात..
एक दिवस त्यांचेच एक व्यापारी मित्र एका अठरा-वीस वयाच्या मुलाला त्यांच्याकडे घेऊन आले...
"अरे रुपाल, ह्याला दोन महिने ठेव कामाला...तुझ्या इतर सेल्समन बरोबर करेल काम त्यांचा मदतनीस म्हणून...येईल मात्र रोज संध्याकाळी चार तास"
रुपालने एकदा त्या मुलाकडे पाहिले. सोज्वळ दिसला..... डोळ्यात तेज दिसले पण गरीब परिस्थितीतला असावा...चेहेराच सांगतो तसे..उंच, गोरा आणि नीटनेटके कपडे होते त्याचे...त्यांनी त्याला जास्त काही विचारले नाही कारण त्यांच्या मित्रानेच त्याला आणला होता...नाव मात्र विचारले..
"विनायक...आपण मला विनू म्हटले तरी आवडेल" मुलगा म्हणाला..
"उद्यापासून ये मग विनू ...आणि पगार इतरांच्या निम्मा मिळेल ..."
"नको..मला पगार नको शेठजी..मी नुसता कामाचा अनुभव घेणार आहे..." विनू
रुपालच्या मित्रांनी विनूला सांगून पाहिले की असे फुकट काम करू नये...रुपालही तसेच म्हणाले पण विनू पुन: नम्रतेने म्हणाला..."अहो खरेच नको...फायदा माझाच आहे...मला नाही का अनुभव मिळणार...?"
एक दोन आठवड्यातच रुपाल शेठना कळून चुकले हे पाणी काही वेगळेच आहे...
विनू आता सर्वांचा मित्र झाला होता..खूप मेहेनत करत होता..अधून मधून रुपाल शेठना व्यवसायातल्या काही बारकाव्याबद्दल तो विचारीत असे... त्यांच्या इतर सेल्समनच्या डोक्यातही येणार नाहीत अशा शक्यता विनायक कल्पना करून मांडत असे आणि चर्चा करत असे..रुपाल हळू हळू त्याला अशा काही क्लुप्त्या सांगत ज्या ते इतर कुठल्याच सेल्समनबरोबर कधीच बोलले नव्हते..
दोन महिने होत आले होते..
एकदा पुण्यातले असेच परांजपे नावाचे एक बडे व्यापारी रुपाल शेठकडे आले...त्यांच्या गप्पा रंगत आल्या..
"विनू, अरे जरा पाणी सांग आणि चहा पण सांग..." त्यांनी विनूला फर्मावले...
"विनू आत्ताच बाहेर पळत गेला शेठ...बहुतेक कोणाला तरी भेटायला गेला मागल्या दारातून...
एक बडे व्यापारी आले असता हा पळाला...रुपालना नक्की ह्यात काळेबेरे वाटले...बहुतेक विनू परांजप्यांकडे कडे नोकरीला होता आणि काहीतरी फसवा-फसवी करून पळालेला असावा....त्यांची नक्की खात्री झाली..
"येऊ दे त्याला परत..पोलिसांकडेच देतो" असे ते म्हणाले खरे, पण विनू नंतर आलाच नाही...दुस-या दिवशीही आला नाही...
रुपालनी मित्राला फोन लावला...
"अरे तू आणलेस म्हणून मी त्या चोराला दुकानात ठेवले..पण काल परांजपे शेठ आले असता हा बाहेर पळाला..आजही आला नाही..तोंडच दाखवले नाही त्याने...मी पोलिसात वर्दी देणार आहे.."
मित्र क्षणभर गप्प होता..मग म्हणाला..
"एक दिवस थांब..मी आणतो त्याला उद्या तुझ्याकडे...असा त्याला सोडायचा नाही आपण पण अजून पोलिसांकडे मात्र जाऊ नको"
दुस-या दिवशी मित्र आणि विनू रुपालच्या दुकानात हजर..
मित्र विनूला म्हणाला..."काय रे असा चोरासारखा पळून का गेलास ते सांग आता ह्या शेठना..."
"काका...अहो मी तुम्हाला आधीच नवते का सांगितले...की..ज्या दिवशी माझ्या बाबांना मी इथे दिसेन त्या दिवशी हे नाटक बंद...!!! आठवतय ना?"
नाटक..? रुपाल बघतच राहिले..
इतक्यात स्वत: परांजपे शेठ तिथे आले..
"रुपाल...अरविंद हा माझाच मुलगा...इथे विनू म्हणून राहिला आणि हे नाटक मलाही खरेच माहित नव्हते..."
घरी गेल्यावर अरविंद बाबांना म्हणाला...
"बाबा..ते सेल्समन काय आणि कसे बोलतात..त्यांच्या सवयी, लबाड्या...हे जसे मला ह्या दोन महिन्यात कळले तशा त्यांच्या ट्रेनिंगच्या गरजा आणि कशा प्रकारच्या अपेक्षा ठेऊन ते असतात हे मला चांगले पहाता आले...आपल्या दुकानात मी नक्की ह्या नव्या ज्ञानाचा उपयोग करीन.."
परांजपे मोठ्या कौतुकाने अरविंदकडे पहात होते...
मधुसूदन थत्ते
२३-०६-२०१५
(एका सत्य घटनेवरून..नावे आणि काही प्रसंग बदलून लिहिलेली ही घटना आहे)
२३-०६-२०१५
(एका सत्य घटनेवरून..नावे आणि काही प्रसंग बदलून लिहिलेली ही घटना आहे)
No comments:
Post a Comment