Wednesday, December 2, 2015

रिदम...

शब्दातच कसं आगळं आकर्षण आहे.

४०-५० वर्षांपूर्वी मुंबईला संगीत साधनांच्या एका भव्य दालनाला नाव दिलं होतं "रिदम हाउस". केवळ ह्या नावामुळे मी तिथे जाऊन आलो होतो एकदा.

पण रिदम केवळ संगीतातच असतो का...? नाही...तो तर आपल्या उभ्या अस्तित्वात असतो...ती एक लय असते...एक समेवर सातत्याने येणारा ताल असतो...एक धृपद असते ज्यावर येउन आपण थबकतो...आणि पुन: मार्गी लागतो...

काव्यात रिदम आहे...निसर्गात रिदम आहे...ऋतूत रिदम आहे...असं म्हणतात की ताल वाद्य माणसाला सुचलं ते टप टप अशा कमलदलावर पडणा-या पावसाच्या जल बिंदुंच्या आवाजामुळे...

मी सकाळी फिरायला जातो..माझ्या चालण्यात रिदम असतो...मी नामस्मरण करतो त्यात रिदम असतो...रुळावरून धावणा-या गाडीच्या जाण्यात रिदम असतो...इतकंच काय, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत असलेला रिदम मला जाणवतो आणि लक्षात येतं.... अरे आपण हा विचार तर आधी केला होतं...आणि मग मी त्याला आणखी जरा पुढच्या पायरीवर नेऊन ठेवतो...

सागर लहरींचा रिदम असतो...सागराचा भरती-ओहोटिचा रिदम असतो आणि युगा-युगात कोलंबस जन्माला यावेत असा विधात्याने निर्मिलेला रिदम असतो.

आकाशस्थ ग्रहांच्या अंतराळात भ्रमण करण्याला रिदम असतो...म्हणूनच की काय..दर साडे बावीस वर्षांनी शनीची साडेसाती येते आणि दर अडीच दिवसांनी चंद्र...जो आपल्या मनाचा कारक आहे...राश्यांतर करतो आणि आपल्या मनाला डोलवत रहातो...

मी बेताल कधीच वागणार नाही...आणि बे-रिदम जगूही शकणार नाही...

मधुसूदन थत्ते
०३-१२-२०१५

No comments: