Friday, November 20, 2015

पोर माहेरी दोन दिवस आली
पोर माहेरी दोन दिवस आली, भुर्रकन गेली. आईच्या मायेत न्हाली, मायेचा शिडकावा आई-बाबांवर पसरून गेली.
दाणापाण्याची सोय बघायला जायला हवे. …..<<पंख फुटले, पिल्ले गेली, पाखरे तिथेच>>…….. इथे पाखरांची उपमा संपते.
मुले मात्र परत येतात. घरट्याची आठवण येते. घरट्यात अमोल आठवणी जपलेल्या, त्यात आई-बाबांचा जिव्हाळा. त्यांना उजाळा द्यायला नको का? आई-बाबांना तरी त्या आठवणींशिवाय वेगळे किती असणार?
एकत्र कुटुंबांचा मागील काळ किती वेगळा!!
आज फक्त वृद्ध आई-बाबा मागे उरतात…. रोजसाठी एकमेकांशिवाय आणखी कोणी असणार? त्यातला एक गेला तर?
पण ही तर आजची जगरहाटी. त्याला सामोरे जाणे भाग आहे. हे चित्र मागील काळी फारसे दिसायचे नाहीं.

मधुसूदन थत्ते
May 17, 2011
=================================================


झुक झुक इंजिनात ड्रायव्हर शेजारी उभे राहून कोणी कोणी अनोखा असा अनुभव घेतलाय?
मी घेतलाय. दहा वर्षाचा असतांना घेतलाय..
पाचोरा ते जामनेर असा त्याकाळी एक रेल्वे मार्ग होता...माझे एक काका इंजिन ड्रायव्हर होते...

एकदा मला आणि १२ वर्षाच्या माझ्या बहिणीला म्हणाले..
"चला रे पोरांनो..तुम्हाला आज घेऊन जातो जामनेरला..."
आमचा आनंद गगनात मावेना..
काका आणि एक फायरमन दोघे चढले इंजिनात...आम्हाला उचलून घेतले त्यांनी..आपापल्या डोक्याला लाल फडकी बांधली..आमच्या डोक्यालाही फडकी बांधली...हात वर करून काकांनी एक दोरी खेचली अन इंजिन कोकलले...कू...कू...चाकांनी तिथेच रुळावर थयथयाट केला अन लागली पुढे पुढे आम्हाला न्यायला...
फायरमनने मग त्या भट्टीचे दार उघडले..बाप रे...कसली आग भडकलेली दिसली आत..मग त्याने फावड्याने कोळसा आत टाकला...काका बाहेरच्यांना सलाम करत करत मागे वळून पूर्ण गाडीकडे बघत बघत आणि हातात एक तारेचा गोल घेऊन काही तरी येण्याची वाट बघत होते..
इतक्यात खाली उभ्या असलेल्या सिग्नल मन ने तसाच एक तारेचा गोल काकांना दिला आणि काकांच्या हातातला स्वत: घेतला..
हे देण्या घेण्याचे प्रकरण पुढे खूप खूप दिवसांनी मला कळले...
मार्गावर एक एक स्टेशने येत गेली..अधे मधे काका वेग खूप कमी करायचे,,,लाइनच्या दुतर्फा शेतकरी उभे असायचे...फायर मन त्यांना फावडे फावडे विस्तव द्यायचा आणि ते शेतकरी मोबदल्यात कधी भुइमुगाच्या शेंगा, कधी केळी..कधी करवंदे असे देत जायचे...ह्या व्यवहारातल्या नीती-अनीतीचा विचार करण्याचे आमचे वय नव्हते..आम्ही फक्त आत येणा-या मालावर ताव मारला...
जामनेर आले...डबे सोडून काका इंजिन घेऊन खूप पुढे गेले...तिथे एक गोलाकार खूप मोठेच्या मोठे फिरणारे चक्र होते. त्या चक्रावर आमचे इंजिन मधोमध आले आणि खालच्या दोन माणसांनी ते चक्र पूर्ण फिरवले..इतपत की आमचे इंजिन आता एकदम परतीच्या दिशेला झाले..
हो..आम्ही असेच परत जाणार होतो..
झुक झुक झुक झुक...
आज ७७ वयाच्या बहिणीशी हा विषय मी मुद्दाम काढतो...
दोघांनाही ह्या वयात सुद्धा पुन: इंजिनात बसायचे असते..
मधुसूदन थत्ते
१५-०६-२०
============================================
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या एका मासिकासाठी दिलेले हे माझे मनोगत नव्या मित्रांसाठी पुन: दिले आहे
--------------------------------------------------------------------
अश्रूंची जातकुळी
अळी मिळी गुप चिळी पहिला बोलेल तो....
मी ६-७ वर्षाचा असेन, मोठी बहिण असेल २ वर्षांनी मोठी. धाक फार तिचा...आज दोघे सत्तर पार ...परवा तिला ह्याची आठवण करून दिली...दोघे मग बराच काळ " गुप चिळी " च्या रम्य राज्यात होतो...
हळूच डोळ्यात अश्रू चमकला. तिने तो पाहिला...म्हणते..."ह्या अश्रूची जात कुळी कोणची रे"....
दूर बनारसला कॉलेज प्रवेश मिळाला. बहिण आणि आई-बाबा होस्टेल मध्ये मला एकट्
याला सोडून मुंबईला निघाले, रिक्षात मागे वळून वळून ती पहात होती...साश्रू नयनांनी... मी मनी तिला विचारले ""ह्या अश्रूची जात कुळी कोणची ग?" पण ती सासरी जाताना साश्रू नयनांनी निघाली तेंव्हा समजले ते रिक्षातले आणि हे इथले...एकच जात कुळी की..!!!
मला पदवी मिळाली, विशेष प्राविण्य मिळाले...घरी आधीच कळले होते..आलो, तर देवघरात आई..देवाला मनोभावे कांही सांगत असावी. बाहेर आली. माझा नमस्कार घेत म्हणाली "असेच यश मिळव" तिच्या डोळ्यातला अश्रू तिने का लपवला? ती तर वात्सल्याची जात कुळी.
बाबा गेले. त्याना उचलताना फार आक्रोश झाला. देवा ह्या जात कुळीचे अश्रू कोणाच्या वाट्याला आणू नकोस असे अशक्य साकडे मी देवाला घातले.
प्रेमळ पत्नी लाभली. माझ्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू यावे असे घडले कांही वेळा पण नंतर माझी उशी आसवांनी भिजलेली पाहून जी आसवे तिने गाळली...त्या जात कुळीचा अंदाज तरी येईल का तुम्हाला....???
सांगा पाहू या सर्वातील कुठली जात कुळी अधिक मोलाची?
हा प्रश्नच निरर्थक नाही का?
मधुसूदन थत्ते
April 2012

No comments: