Friday, November 20, 2015

इथल्या एका अमेरिकन सुशिक्षित व्यक्तीने मला प्रश्न विचारला..
" महोदय...तुम्ही शेण आणि गोमूत्र पवित्र मानता आणि ancient काळापासून त्याचा वापर तुमच्या संस्कारात सांगितला आहे....तर मला सांगा ह्यात काय ingredient तुम्हाला इतकी पवित्र आणि शास्त्रशुद्ध वाटतात की ह्या गोष्टी तुम्ही अजून वापरता...त्यापासून साबण वगैरे बनवता...गोमूत्र पीता...शेणाचे पवित्र म्हणून काही वेळा सेवन करता..."
"भल्या माणसा, आमची श्रद्धा हेच ह्याचे उत्तर आहे...पण तू गूगल वर पाहू शकतोस ह्याचे उत्तर आहे का ते " ....ह्यापलीकडे मी काहीही सांगू शकलो नाही...
कोणी ह्यावर इथल्या लोकांना पटेल असे उत्तर देऊ शकेल का?
{सध्याच्या वास्तव्यात इथे हे माझे इंग्रजी मधून त्याच्याशी बोलणे झाले नुकतेच}
मधुसूदन थत्ते
१३-०८-२०१३
============================
मित्रांनो, आजच्या "मराठी" दिनानिमित्त....
----------------------------------------------
नर्मदा परिक्रमा
एक अतिशय सुरेख DVD Presentation ह्या विषयावर आम्ही पाहिले ...
इतके जिवंत चित्रिकरण आणि साधला गेलेला संवाद आहे हा की जसजसे आपण पुढे पहात जातो तसतशी ही अति पवित्र नर्मदा-मैय्या जणू आपल्या हातात हात देऊन आपल्यासह पावले टाकते आणि त्या एकूण तीन-चार हजार मैलाच्या वाटचालीत आपला इथल्या जगण्यातला सारा अर्थच बदलून टाकते....एका अत्युच्च स्तरावरून "रोज मर्रा" जिन्दगीकडे पहायला शिकवते....कदाचित हा बदल कायम होणार नसेलही पण बदल हा होतोच....
कल्पना करा …सतत तीन वर्षे तुम्ही नर्मदेच्या किना-याने चालता आहात..अनवाणी..तुमच्याजवळ फक्त शरीर झाकायला पुरेल असे वस्त्र,
अंथरायला एक आणि पांघरायला एक काहीतरी, एक कमंडलू पाण्याला...बस अन्य काहीही नाही..पैसे नाहीत भांडीकुंडी नाहीत...
मार्गात, घनदाट जंगले, खडकाळ टेकड्या, द-या-खो-यांचे विभाग...पावसाळा, थंडी, उन्हाळा येत-जात रहाणार...भिक्षा मागायची नाही, आणि कुणी काही दिले तर नाकारायचेही नाही पण फक्त गरजेपुरतेच स्वीकारायचे...
ना ओळख, ना पाळख कुणाची...जी खेडी भेटतील तिथे अठरा विश्वे दारिद्र्यच दिसणार....औषध-पाणी नाही...आजारी पडल्यावर काही उपाय हाताशी नाही...दाढ दुखली?...पाय मुरगळला? डोके दुखतंय? पायात कांटा मोडलाय? सहन करा फक्त....
छे, छे काहीतरीच काय ..केवळ अशक्य...मी तर हेच म्हणालो ते पाहून...
पण जेव्हा पाहिले..सत्तरी उलटलेले. कुणी अधू दृष्टी असलेले, कुणी गुडघे दुखी असलेले, असे महाभाग केवळ श्रद्धेपोटी परिक्रमा करत आहेत तेव्हा हे सारे खरे आहे हे कळले.
ही DVD पन्नाशी उलटलेल्या श्री व सौ चितळे ह्यांनी केली आहे...त्यांची परिक्रमा पूर्ण झाल्यावर...आठवणी सांगून आणि नंतर काढलेले फोटो त्यात घालून....
""आम्ही भयानक थंडी झेलली, पावसात खूप भिजलो, कडक उन्हात चाललो...क्वचित भुकेले अर्धी रोटी फक्त दोघात कोरडी खाऊन राहिलो..." बाई सांगत होत्या...
का हे असे कष्ट करायचे? आता घरी रहाण्याचे प्रेम वा आकर्षण उरले नाही अशी अवस्था असलेले हे करतात का?
अजिबात नाही....बाई सांगत होत्या..."हा एक आगळा असा आत्मिक आनंद आहे...आपण जीवनाच्या फार वेगळ्या, उंच अशा स्तरावर जात असल्याची भावना असते इथे...माता नर्मदा तुम्हाला केव्हा ना केव्हा कसल्या ना कसल्या रूपात भेटते..प्रसाद देते, आशीर्वाद देते...
"तुम्हाला ऐकून खरे वाटणार नाही...आम्हाला प्रत्यक्ष अश्वत्थामा भेटला...त्याने आम्हाला जेऊ घातले ..."
मी मनाला म्हंटले....हे घडते...प्रत्येक गोष्टीला logic लावू नकोस...काही गोष्टी कल्पनातीत असतात...त्या अनुभवायच्या असतात...
मी संभ्रमात पडलो....आयुष्य ही पण एक "नर्मदा" परिक्रमा आहे का काही जणांसाठी...?
मधुसूदन थत्ते
२८-०७-२०१३
===================================
"काका, तुम्हाला अभिजात संगीत इतके आवडते...मग हल्ली तुम्ही पुण्यातल्या सवाई गंधर्व महोत्सवाला कसे जात नाही?"....फेस बुक मित्र विचारात होता....
"कारण स्पष्ट आहे मित्रा"...मी म्हणालो...
"कल्पना कर... आम्ही रात्रभर जागून, पहाटे कधी परवीन सुलतानाचा तोडी तर कधी जसराजजी यांचा भैरव ऐकून अखेर पंडीत भीमसेन यांचा ललत भटीहार आणि सवाई गंधर्वांची सुरेल भैरवी (रेकॉर्डेड) ऐकून तृप्त मनानी कसे घरी जात असू...
सुंदर थंडी पसरलेली असायची आणि प्रत्येक समेला (मग त्रिताल असो, झपताल असो...) हाताने वा मानेने हर श्रोता दाद द्यायचा.
"ते दिवस वेगळे होते" असे nostalgic होऊन म्हणणा-या पैकी मी नाही पण रात्री अकरालाच संपणारा हल्लीचा सोहळा जरा कुठे कमी पडतो असे नाही का?"
माझ्या मित्राकडे ह्याचे उत्तर नव्हते..
मधुसूदन थत्ते
१०-०७-२०१३

No comments: