कल्पना कथा
◘◘◘◘◘◘◘◘◘
◘◘◘◘◘◘◘◘◘
एक हसतमुख चेहेरा सामोरा आला...वय असेल सत्तरीचे...माझ्याहून थोडे लहान असे हे गृहस्थ उजवीकडे झुकले होते आणि म्हणून दुडकी चाल होती त्यांची...कारण हातात पाच किलो वजनाचे दळण एका पिशवीत होते..
हसले तोंडभर मला पाहून..."सुनबाई कामाला जातात मग मीच आणतो भाजी, दळण, किरकोळ बाजार हाट..."
ओळख ना पाळख...पण जणू मी त्यांचा शाळा-मित्र...
मी पुढे झालो, "चला मी पिशवीचा एक कान पकडतो, तुम्ही दुसरा..तेवढेच ओझे कमी..."...मी
"अहो मला जायचं सारंग complex मधे, जातो मी हळू हळू..."...ते म्हणाले..मग मी कोण तुम्ही कोण अशी नावे सांगितली आम्ही...
ते होते दत्तू जोशी...
मी आग्रह केला आणि केली त्यांना मदत..
पण हा हसत मुख चेहेरा काही मला विसरणं शक्य नव्हतं..होईन का मी कधी असा हसतमुख..? उगीच वाटून गेले ...
ह्यानंतर काही काळ गेला. एक दिवस मी मंडईत भाजीसाठी गेलो होतो...कानी संवाद आला..
"अहो, कांदे साठ रुपये? चाळीस होते ना काल परवा...बघा काही कमी करा...मालकीण रागावतील नाहीतर..."
मी पाहू लागलो...कोण आहे हा ज्याला मालकिणीची भीती वाटते आहे...
अन, माझ्या आश्चर्याला सीमाच उरली नाही...
ते होते दत्तू जोशी..
भाजी घेऊन बाहेर मी त्यांना गाठले...
"नमस्कार, ओळखले का?"..मी
ते जरा चमकले पण म्हणाले.."हो पाहिले आहे मी तुम्हाला ..बिबवेवाडीत रहाता ना?"..
मी आग्रहाने त्यांना गाडीत बसवले, नाहीतर १३ नंबरच्या बसने जाणार होते ..तसेच ते आलेही होते.
ह्यानंतर आणखी काही काळ गेला. एक दिवस मी ठरवले दत्तू जोश्यांच्या घरी जायचेच...घर-पत्ता आता ठाऊक होताच..
गेलो..
गेलो..
"मी मधुसूदन थत्ते" दार उघडलेल्या तिशीतल्या एका बाईला मी सांगितले..
"दत्तू जोशी इथेच रहातात ना..?"
ती स्त्रीही अतिशय हसत मुख आणि प्रसन्न चेहे-याची होती..आत शिरताच धुपाचा सुवास दरवळलेला अनुभवला...
"हो, या ना आत...दत्तुकाका जरा बाहेर गेले आहेत.....ती
"ओहो..मग मी येतो नंतर..." मी उठू लागलो...
"अहो नको..थांबा...मी ओळखते तुम्हाला...तुमच्या posts मी नित्य वाचत असते...फेस बुक मित्र आहात तुम्ही माझे...पहा रेवती पाटणकर नाव"...ती..
मी चाटच पडलो...
"नाही मी सहजच आलो होतो...तुमचे सासरेबुवा मला फार आवडतात..भेटत असतो आम्ही अधून मधून..."
"आहेतच ते फार प्रेमळ आणि खूप कष्टाळू पण.."...ती
"हो. जड दळण आणतांना मी पाहिले आहे त्यांना...आणि भाजीवाल्याला भाव कमी कर सांगतांना म्हणतात...सुनबाई रागावतील इतकी महाग भाजी आणली तर..."..मी
"काका, तुमच्या सारख्या ज्येष्ठापासून मी काय लपवून ठेऊ..? अहो ते माझे सासरे नाहीत...!!!"
"म्हणजे?."...मी
"दत्तूकाका माझ्या सास-यांकडे कारकून होते. जमिनी-शेती...ही सारी कामे चोख पहायचे..सासरे गेले...दत्तूकाकांना कोणीच आधार उरला नाही. मग आम्ही त्यांना इथे आणले....
तुम्हाला दिसले मला सुनबाई म्हणताना...पण..खूप सांगून पाहिले..मला ते सुनबाई कधीच म्हणाले नाहीत...रेवतीताई असेच म्हणत रहातात...!!! "...ती
माझे न विचारलेले प्रश्न तिने जाणले. म्हणाली...
"काका, मामंजी गेले पण दत्तूकाकांनी त्यांची जागा घेतली...तसेच प्रेमळ..पण कष्ट करणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले...खूप कामे करत असतात घरातली..."...ती..
इतक्यात बेल वाजली..
दत्तूकाकाच होते.
आत आले. मला पाहिलं आणि तेच नेहेमीचे चेहे-यावरचे प्रभावी हास्य आतले वातावरण बदलून गेले...
"अलभ्य लाभ...थत्ते काका...तुम्ही...?? सुनबाई चहा टाका मस्त...कधी घेत नाही पण आज मी चहा घेणार..."..दत्तू काका..
मला वाटतं आज रेवतीला दत्तूकाकांनी आयुष्यात प्रथमच सुनबाई मानले होते...!!!!
मधुसूदन थत्ते
२१-११-२०१५
(Representative picture from Google)
२१-११-२०१५
(Representative picture from Google)
No comments:
Post a Comment